आनंदाचा शिधा मिळणार असल्याने राज्यातील शिधापत्रिका धारकांचा गणेशोत्सव होणार गोड – आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला :
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना गौरी-गणपती उत्सवानिमित्त सणासुदीच्या काळात सवलतीच्या १०० रुपये दरात आनंदाचा शिधा देण्यात येणार असून यामुळे राज्यातील नागरिकांचा गणेशोत्सव गोड होणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
यंदा,गौरी-गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ०८६ शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या १०० रुपये दरात प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो चनाडाळ,१ किलो साखर व १ लिटर सोयाबीन तेल असा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.यासाठी ५६२ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली असल्याचे आम. शहाजीबापू पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या महायुती सरकारकडून दिवाळी,गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,गौरी-गणपती उत्सव,श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा,छ.शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिधापत्रिका धारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमास राज्यात उत्तम प्रतिसाद लाभल्याने त्याच धर्तीवर यंदा गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो चनाडाळ,१ किलो साखर व १ लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात १०० रुपयांत देण्यात येणार आहे.
याबाबत राज्य सरकारकडून शासनादेश प्रसिध्द करण्यात आला असून आनंदाचा शिधा वाटपासाठी निविदा प्रक्रिया यंदा २१ ऐवजी ८ दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून आनंदाचा शिधा निविदा प्रक्रिया आणि ५६२ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चास जीआरद्वारे मान्यता देण्यात आली असल्याचे आम.शहाजीबापू पाटील यांनी सांगीतले.
——————————————————————————