शैक्षणिक

अजनाळेच्या अभिनव पब्लिक स्कूलमध्ये रंगला बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा

सांगोला :
       सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील अभिनव पब्लिक स्कूलमधील वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले,पालखी मिरवणूक,रिंगण व विठू माऊलीच्या नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त अभिनवच्या बाल वारकर्‍यांचा नयनरम्य बालदिंडी व रिंगण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
  यावेळी शाळेतील सर्व मुला-मुलींनी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते.विठ्ठल रखुमाई,संत ज्ञानेश्वर,संत निवृत्तीनाथ,संत सोपान देव आणि संत मुक्ताई यांच्या वेशभूषा साकारलेले विद्यार्थी या दिंडी सोहळ्याचे आकर्षण ठरले. मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे मॅडम व उपस्थित पालक वर्गाच्या हस्ते विठ्ठल रखुमाई,संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा व पालखीचे पूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी सादर केलेला रिंगण सोहळा,मुलांच्या हातात टाळ,भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन पाहून सर्वांना खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. यावेळी,अनेक विद्यार्थ्यांनी अभंग सादर करत विठू नामाचा गजर केला.
           याप्रसंगी,विठ्ठल रुक्मिणी यांच्यासोबत महिला, पालक तसेच इतर वारकरी बालचंमूनी फुगडी खेळत या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला.या नयनरम्य सोहळ्याची सांगता उत्साहात व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button