सांगोला :
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी सध्या महाराष्ट्र शासनाची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.या योजनेची अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही नगरपरिषदेमार्फत नि:शुल्क करण्यात येणार असून या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याचा मोबाईल क्रमांक व आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक असल्याची माहिती नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांनी दिली.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची सांगोला शहरात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गुरुवारी नगरपरिषद कार्यालयात प्रशिक्षण शिबिर पार पडले. सदर शिबीरात लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी हे बोलत होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपरिषदेच्या नोडल अधिकारी तृप्ती रसाळ यांनी केले. तर,महिला व बालकल्याण अधिकारी वर्षा पाटील यांनी या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या
या योजनेसाठी राज्यातील २१ ते ६५ या वयोगटातील विवाहित,विधवा,घटस्फोटीत परित्यक्त्या,निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला पात्र आहे. अर्ज भरण्यासाठी पात्र महिला आपल्या भागातील जवळच्या अंगणवाडी या ठिकाणी किंवा नगर नगरपरिषद कार्यालयात जाऊ शकतात. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी ‘नारीशक्ती दूत’ या अँपचा वापर करायचा असून अर्जदाराची संपूर्ण माहिती भरुन झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अँपवरती अपलोड करायची आहेत.
तसेच ज्या महिलांचे स्वतंत्र बँक खाते नाही,त्यांनी स्वतःचे पोस्टामध्ये नवीन बँक खाते उघडावे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना लाभार्थी अन्य कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नाही,याचे हमीपत्र देणे बंधनकारक आहे.शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड या दोन्ही कागदपत्रांवरील जन्माची तारीख एकच असणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये अशा प्रकारची तफावत आहे,त्यांनी आधार कार्ड व इतर कागदपत्रे दुरुस्त करुन फॉर्म भरायचा आहे.तरी, सर्व पात्र लाभार्थ्यांनी जवळची अंगणवाडी किंवा नगरपरिषद कार्यालयात जाऊन योजनेचा फॉर्म भरावा,असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.
———————————————————————
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :
१)आधार कार्ड,
२) अधिवास प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक प्रमाणपत्र
(टीप : अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड/मतदान ओळखपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक प्रमाणपत्र)
३) महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचा जन्म दाखला/ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/अधिवास प्रमाणपत्र
४) उत्पन्न प्रमाणपत्र (रु.२.५० लाखांपर्यंत)/पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी एक
५) अर्जदाराचे हमीपत्र
६) बँक पासबुक (आधार लिंक असलेले)
७) अर्जदाराचा फोटो (स्वतः लाभार्थी महिला उपस्थित असणे आवश्यक)
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
आपुलकी प्रतिष्ठानचा गुंफण सामाजिक पुरस्काराने गौरव