महत्वाच्या बातम्या

सांगोला उपसा सिंचन योजनेला चालू अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणार – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

सांगोला :

गेली २३ वर्षे निधी अभावी धूळखात पडून असलेल्या सांगोला उपसा सिंचन योजना अर्थात उजनी उपसा सिंचन योजनेला येत्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देऊन आगामी अर्थसंकल्पात या योजनेच्या पूर्ततेसाठी भरीव निधीची तरतूद करणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.

                         नुकत्याच सोलापूर येथे पार पडलेल्या पक्षाच्या मेळाव्यात अजितदादांकडे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत खुद्द उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनीच ग्रीन सिग्नल दिल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये एकप्रकारचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उजनी धरणातून सांगोला तालुक्यासाठी तब्बल २ टीएमसी पाणी मंजूर होते.या योजनेचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या हस्ते साळमुख (ता. माळशिरस) येथे भूमिपूजनही करण्यात आले होते.मात्र, भूमीपुजनानंतर ही योजना रेंगाळली आणि सांगोला तालुक्याला पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाली. परंतु,सांगोला तालुक्याचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केल्याने ही योजना पूर्ण करुन सांगोला तालुक्याला हक्काचे २ टीएमसी पाणी देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या योजनेची पूर्तता करण्यासाठी येत्या मंत्रिमंडळ (कॅबिनेट) बैठकीत या योजनेस अंतिम प्रशासकीय मान्यता देऊन हवा तितका निधी देऊ आणि ही योजना लवकरात लवकर पूर्ण करु आणि यासाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद करु,असेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर येथील मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचे सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आले.या मेळाव्यासाठी सांगोला तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनीही उपस्थिती लावली होती.

यासंदर्भात बोलताना माजी आमदार दीपकआबा म्हणाले की,वर्षानुवर्षे मंत्रालयाच्या फाईलीत अडकलेली योजना मार्गी लावल्यास सांगोला तालुक्याला यातून हक्काचे २ टीएमसी पाणी मंजूर होणार आहे.या पाण्यातून तालुक्यातील सिंचनापासून वंचित गावातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. कागदोपत्री पाणी मंजूर असूनही सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.शेतीला पाणी नाही व जनावरांना चारा नाही, अशा परिस्थितीत राज्य सरकारने मायबाप जनतेवर कृपा दाखवावी आणि रखडलेल्या सांगोला उपसा सिंचन योजना अर्थात उजनी उपसा सिंचन योजनेला निधीची तरतूद करावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा यांनी नुकत्याच सोलापूर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली होती.या मेळाव्यात बोलताना दीपकआबांच्या मागणीला दादांनीही ग्रीन सिग्नल दिल्याने उजनीचे २ टीएमसी पाणी सांगोला तालुक्याला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
—————————————————————————

सिंचनापासून वंचित गावांना होणार फायदा :

सांगोला तालुका हा तालुका नैसर्गिकदृष्ट्या अवर्षणप्रवण असल्याने सातत्याने पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न दरवर्षी शेतकऱ्यांना सतावतो.यावर शाश्वत मार्ग काढण्यासाठी सरकारने तालुक्यासाठी सांगोला उपसा सिंचन सारख्या योजनांना मान्यता देऊन या योजनांना निधीची तरतूद करावी,अशी मागणी उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आपण केली होती. दादांनी याला सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास नेण्याचा विश्वास दिला असून ही योजना पूर्ण झाल्यानंतर सांगोला तालुक्यातील सिंचनापासून वंचित असणाऱ्या अनेक गावांना याचा लाभ होणार आहे.
                                    – दीपकआबा साळुंखे-पाटील——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button