पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरु करण्याची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी :
आषाढी वारी व कार्तिकी वारीसाठी तसेच वर्षभर पंढरपूरला येणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांच्या प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी दादर-पंढरपूर-दादर ही रेल्वे सेवा दैनिक सुरु करुन तिला “चंद्रभागा एक्सप्रेस” असे नाव द्यावे. तसेच पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरु करावी,अशी मागणी माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचेकडे केली आहे.
खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या या मागणीला अधिक बळ मिळण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्वपक्षीय ४२ खासदारांच्या सह्या घेऊन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना हे निवेदन सादर केले असून सोलापूर जिल्ह्याच्या वाहतूक,व्यापार,शेती आणि दळणवळणाच्या विकासाला गती देण्यासाठी विविध प्रलंबित रेल्वे प्रश्नांबाबतही सविस्तर चर्चा केली व महत्त्वाच्या मागण्यांचा पाठपुरावा केला.
निवेदनात दिलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल,असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना दिले.
=========================
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिले विवीध मागण्यांचे निवेदन :
* पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षण व भूमी अधिग्रहणाबाबत वरिष्ठ स्तरावर तातडीची बैठक आयोजित करुन प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली.
* माढा तालुक्यातील मोडनिंब येथे ‘गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल’ (GCT) उभारणीचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
* सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली आणि सध्या बंद असलेली दिल्ली-कोलकत्ता-मुजफ्फरनगर-शालिमार ‘किसान रेल्वे’ ही सेवा पुन्हा सुरु करण्याची विनंती करण्यात आली.
* लातूर-कुर्डूवाडी-सोलापूर व मिरज-कुर्डूवाडी-दौंड कॉर्ड लाईन प्रकल्पांना गती देण्याची मागणी करण्यात आली.
* मिरज-कुर्डूवाडी-लातूर रोड या सुमारे ३७५ कि.मी.लांबीच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण तातडीने पूर्ण करुन प्रकल्पाला वेग देण्याचीही मागणी करण्यात आली.
* सोलापूर रेल्वे विभागातील वाढती लोकसंख्या आणि पंढरपूरकडे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा विचार करुन सांगोला तालुक्यातील जवळा व बामणी आणि पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव तसेच माढा तालुक्यातील म्हैसगाव व लऊळ येथे नवीन रेल्वे स्थानके मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली.
* कुर्डूवाडी-पंढरपूर मार्गावरील वापरात नसलेल्या जुन्या मीटरगेज रेल्वे मार्गालगतची रिक्त जमीन विकासासाठी वापरुन तेथे व्यापारी संकुले उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडण्यात आला.
==========================
More Stories
गणेशोत्सवातील महाप्रसादासाठी FDA नोंदणी बंधनकारक – डॉ.मंगेश लवटे
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा