दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा

सांगोला :

ऐन पावसाळ्यातही पावसाने सांगोला तालुक्याकडे पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून तालुक्यातील बळीराजा व जनावरांची तहान भागवण्यासाठी कृष्णा,कोयना, पंचगंगा,भीमा आणि नीरा नदीतील पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी टेंभू उपसा सिंचन योजना तसेच म्हैसाळ योजना व निरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्यातील माणगंगा व कोरडा या प्रमुख नद्यांसह स्थानिक ओढे,नाले आणि तलावात त्वरित सोडावे,अशी आग्रही मागणी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली आहे.

सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्नाबाबत माजी आमदार दीपकआबा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी २७ जुलै रोजी तहसीलदार बाळूताई भागवत यांना लेखी निवेदन दिले.यावेळी बोलताना दीपकआबा पुढे म्हणाले की, पावसाळ्यातील दोन महिन्यात एकदाही पुरेसा पाऊस न झाल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे.त्याचबरोबर,तालुक्यातील विहिरी, तलाव,ओढे,नाले,बंधारे व कुपनलिका असे जलस्रोतही भूजल पातळी खालावल्याने पूर्णपणे आटले आहेत.अशा परिस्थितीत सांगोला तालुक्यावर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.हे संकट दूर करण्यासाठी कृष्णा,कोयना,पंचगंगा व नीरा या नदीपात्रातील अतिवृष्टीमुळे वाहून जाणारे पाणी टेंभू उपसा सिंचन योजनेतून माण नदीत सोडावे व या नदीवरील सर्व बंधारे तसेच टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात असणारे बुधेहाळ व अन्य तलाव आणि ओढे,नाले भरुन द्यावेत.

त्याचबरोबर,म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पारे,जवळा या गावातील तलावासह कोरडा नदीत हे पाणी सोडून नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे सर्व बंधारे भरुन द्यावेत त्याचबरोबर,योजनेच्या लाभक्षेत्रातील सर्व छोटे-मोठे तलाव व ओढे,नाले भरुन देण्यात यावेत.तसेच निरा उजवा कालव्यातून पाणी सोडून फाटा क्र.४ व ५ ला पाणी शेवटपर्यंत पूर्ण क्षमतेने सोडावे.त्याचबरोबर तालुक्यातील चिंचोली तलाव तसेच सोनके तलाव,अन्य ओढे,नाल्यांना पाणी सोडावे. त्याचबरोबर,राजेवाडी तलाव भरुन देण्यात यावा.त्यामुळे,सांगोला तालुक्यातील अनेक गावांना याचा लाभ होईल. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता,सांगोला तालुक्यावर ओढवलेले हे जलसंकट लवकरात लवकर दूर करण्यासाठी शासन आणि प्रशासन यांनी एकत्रित प्रयत्न करावेत,असेही शेवटी माजी आमदार दीपकआबा यांनी स्पष्ट केले.
                       =========================

भुकेली जनावरे व तहानलेला बळीराजा :

सांगोला तालुक्यात शेती व पशुपालन हे दोन प्रमुख व्यवसाय आहेत.पावसाने पाठ फिरवल्याने आधीच खरीप हंगाम वाया गेला आहे,परिणामी शेतकरी प्रचंड मेटाकुटीला आला आहे.त्याचबरोबर,तालुक्यात प्रचंड चारा व पाणीटंचाई निर्माण झाल्याने पशुपालन हा व्यवसायही प्रचंड संकटात सापडला आहे. जनावरांची भूक आणि बळीराजाची तहान भागवण्यासाठी सांगोला तालुक्याला तात्काळ पाणी सोडावे.
    – दीपकआबा साळुंखे-पाटील
=========================

या भागांना पाण्याची नितांत गरज :

सांगोला तालुक्यासाठी वरदान असणाऱ्या टेंभू,म्हैसाळ व निरा उजवा कालवा या सिंचन योजनामधून तालुक्यातील माणगंगा,कोरडा, बेलवण व आप्रूका या नद्यांसह ओढे,नाले त्याचबरोबर सांगोला शाखा कालवा फाटा ४ व ५ तसेच पारे,हंगीरगे,घेरडी,जवळा,चिंचोली, बुद्धेहाळ, तिसंगी आणि राजेवाडी यांसह छोटे-मोठे तलाव भरुन दिल्यास सांगोला तालुक्यात असणारी भीषण पाणीटंचाई दूर होणार आहे.  त्यामुळे,तालुक्यातील बळीराजासह कृषीधन आणि पशुधन यांना जीवदान मिळण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी दीपकआबांनी सांगीतले.
=========================

You may have missed