सामाजिक

सांगोला रोटरी क्लब आयोजित “मराठी पाऊल पडते पुढे” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगोला :

      मधूर आवाजाचे गायक,गायिका,अद्यावत वाद्यवृंद, पारंपरिक व नाविन्यपूर्ण वेशभूषा,सुंदर सादरीकरण, आकर्षक स्टेज,नेत्रदीपक प्रकाशयोजना व ताज्या दमाचे कलाकार त्यामुळे “मराठी पाऊल पडते पुढे” या सांगोला रोटरी क्लबने आयोजित केलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमास सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांनी
उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या सांगोला रोटरी क्लबच्या वतीने समाजकार्यास आवश्यक असणार्‍या निधी संकलनासाठी सांगोला येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर (टाऊन हाॅल) सभागृहात उदय साटम व ज्योती साटम निर्मित आणि दिग्दर्शित महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा महाकलाविष्कार असलेल्या “मराठी पाऊल पडते पुढे” या बहारदार व सांस्कृतीक कार्यक्रमाचे बुधवारी रात्री आयोजन करण्यात आले होते.


                  “मराठी पाऊल पडते पुढे” च्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठी संस्कृती,परंपरा,चालीरिती,देवधर्म,
हिंदु परंपरा यावर आधारित गाणी, नृत्य व लोकगीते अगदी सुंदर पध्दतीने सादर करण्यात आली.ग्रामीण भागातील जीवन,पहाटगाणी,वासुदेव गीत,देवीचा जोगवा,वाघ्या मुरळी गीत व बहारदार लावणीच्या सादरीकरणामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा व महाराष्ट्र गीताचे सादरीकरण आणि गायन खूपच प्रभावशाली होते. ‘जयोस्तुते’ या स्वातंत्र्यगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

                     “मराठी पाऊल पडते पुढे” च्या निमीत्ताने सांगोलकर नागरिकांना एक चांगला व मराठी संस्कृती जोपासणारा कार्यक्रम पाहण्याची संधी रोटरी क्लबने उपलब्ध करुन दिल्याबद्दल रोटरीचे आभार मानत यापुढे प्रत्येक वर्षी असे कार्यक्रम आयोजित करावेत, अशी ईच्छा कांही नागरिकांनी रोटरीचे अध्यक्ष डाॅ. साजिकराव पाटील व माजी अध्यक्ष दीपकराव चोथे यांच्याकडे व्यक्त केली.सदर कार्यक्रमासाठी अकलूज व पंढरपूर रोटरी क्लबच्या सदस्यांचीही उपस्थिती दिसून आली.

———————————————————————————

रोटरी क्लबच्या संस्थापक सदस्यांचाही झाला सत्कार :

“मराठी पाऊल पडते पुढे” या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगोला येथे रोटरी क्लब सुरु करणाऱ्या व विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून नांवारुपाला आणणार्‍या रो.के.एस.माळी (सी.ए.),रो.डॉ.प्रभाकर माळी,रो.दीपकराव चोथे,रो.सुरेश (आप्पा) माळी, रो.डॉ.मच्छिंद्र सोनलकर,रो.गोविंददादा माळी इ.सर्व संस्थापक सदस्यांचा रोटरीचे अध्यक्ष डाॅ.साजिकराव पाटील यांनी चांदीचे नाणे देऊन सत्कार केला.
———————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button