सांगोला :
सांगोला तालुक्यातील वंचित १२ गावांसाठी वरदायिनी असलेल्या बहुप्रतिक्षीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला काल सोमवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली असून सुमारे ३९ हजार एकर क्षेत्राला या योजनेचे पाणी मिळणार आहे.यासाठी ८८३ कोटी रुपयांच्या खर्चाच्या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाल्याची माहिती मुंबईहून आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
मूळ सन १९९७ मध्ये मंजूर असलेली ७३.५९ कोटी रुपयांच्या सांगोला उपसा सिंचन योजनेच्या कामाला सन २००० साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यावेळी १६ हजार एकर क्षेत्र यामध्ये समाविष्ट होते.परंतु सन २००० ते २०१९ या काळात सदर योजनेच्या कोणत्याही कामाला सुरुवात न झाल्याने मंजुरी नंतर ५ वर्षांनी सन २००६ साली याची प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली.आमदार झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी सन २०२० सालापासून या कामाचा पाठपुरावा केला व नव्याने १२ वंचित गावे आणि सांगोला शाखा कालव्यावरील उच्च भागात असणारी गांवे यासाठी प्रस्ताव तयार करून सुमारे ३९ हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला.
ही योजना पूर्ण करण्यासाठी ८८३ कोटी इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकाला राज्य तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली असून काल सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यात आल्याची माहिती आम.शहाजीबापू पाटील यांनी दिली.
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मागणीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून १७ नोव्हेंबर २०२२ मध्ये “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना,सांगोला” असे नामकरण करण्यात आलेल्या या योजनेतून दीड टीएमसी पाणी बंदीस्त वितरण नलिकेतून लक्ष्मीनगर,अचकदाणी, बागलवाडी,सोनलवाडी,अजनाळे, य.मंगेवाडी,बंडगरवाडी,चिकमहूद, कटफळ,खवासपूर,जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी व इटकी या १२ गावांना सुमारे ३३ हजार एकर क्षेत्राला व अर्धा टीएमसी पाण्यातून सांगोला शाखा कालवा ५ वरील सुमारे ६ हजार एकर असे एकूण ३९ हजार एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार असल्याने दुष्काळी सांगोला तालुका ही ओळख कायमस्वरुपी पुसली जाणार आहे. निवडणुकीमध्ये दिलेला शब्द मी खरा केला असून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या पुढील काळामध्ये पाणी या विषयावर कोणतीही निवडणूक अथवा राजकारण होणार नसल्याची ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी दिली.
—————————————————————————
सांगोला तालुक्याला आत्तापर्यंत सुमारे १२ टीएमसी पाणी मंजूर केल्याबद्दल सर्वांचे आभार :
स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना,सांगोला ही योजना सांगोला तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या खर्चाची योजना असून लवकरच या कामाच्या निविदा प्रसिध्द केल्या जाणार आहेत. आज माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस असून ही योजना मंजूर करण्यामध्ये राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार,खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांचे खूप मोठे योगदान असून सांगोला तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरुपी संपविण्यासाठी टेंभू,म्हैशाळ, निरा उजवा कालवा व उजनीचे २ टीएमसी पाण्यासहित सांगोला तालुक्याला आत्तापर्यंत सुमारे १२ टीएमसी पाणी मंजूर केल्याबद्दल या सर्वांचा मनापासून आभारी आहे.
– आमदार शहाजीबापू पाटील
——————————————————————————
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली फटाक्यांची अतिषबाजी :
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे सांगोला तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या खर्चाची पाण्याची योजना मंजूर झाल्याबद्दल शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व पेढे वाटून शहरातील मुख्य चौकांतून फटाक्यांची अतिषबाजी करत आनंद व्यक्त केला.
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने