वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा, सुजाता मुंदडा-बिहाणीने उमटवला ठसा
अहमदनगर/प्रतिनिधी :
स्त्रीयांचं सौभाग्य हे कुंकु आणि केसात असते,असे आपली भारतीय संस्कृती मानते. मात्र कॅन्सरसारख्या आजारात केमो द्यावे लागतात व त्यामुळे केस गळून स्त्रीयांचा चेहराच बदलून जातो. त्यामुळे केसदान चळवळ राबविली पाहिजे असे सौ. सुजाता मुंदडा-बिहाणी यांना वाटले आणि त्यानुसार या उपक्रमाची सुरुवात त्यांनी स्वत:हून केली असून आपले केसदान करुन ते विंग करण्यासाठी मुंबईला पाठवले. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत असून सौ.सुजाता बिहाणी यांनी आपले स्वत:चे १४ इंच केस दान केले आहे.
या संदर्भात सौ.सुजाता बिहाणी यांनी सांगितले की,आपले वडिल पत्रकार अरुणकुमार मुंदडा यांचा सामाजिक कार्याचा वसा लहानपणापासूनच आम्हाला मिळालेला आहे.हा वसा आम्ही वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे पुढे चालवत असतो.सासरच्या मंडळींचाही त्यात मोलाचा वाटा असतो.आपण अनेक वेळा रक्तदान केले असून वयाच्या बाराव्या वर्षीच मी नेत्रदानाचा संकल्प केला होता.
सौ.सुजाता मुंदडा-बिहाणी ह्या दुबईत राहतात.सध्या त्या मोहजदेवढे (अहमदनगर) येथे असून सौ.सुजाता यांच्या सासुबाई सौ.कमलबाई अशोक बिहानी (मोहजदेवढे,अहमदनगर) यांना दोन वर्षापूर्वी कॅन्सर झाला.त्यानंतर त्यांना केमो देण्यात आला.त्यामुळे त्यांचे केस गळून गेले.त्यांचा चेहरा वेगळा दिसु लागला. त्यामुळे सुजाताला अशा उपक्रमाची किती गरज आहे ? हे लक्षात आले.त्यातुनच केसदान उपक्रम सुरु करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी स्वत:पासूनच या उपक्रमाची सुरुवात करण्याचा निश्चय केला.अशा केसदानातून गरजू पेशंटला विंग बनवून देण्यात येतात.
सौ.सुजाताच्या या उपक्रमास अहमदनगर येथील अजिंठा हेअर सलुनच्या पुजा संग्राम निकम यांनी केस कापण्यासाठी योग्य ते सहकार्य केले. या कार्यक्रमा प्रसंगी इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा लता आडे,माजी अध्यक्षा भाविका चंदे,मोनाली बाकलीवाल (सदस्या) या उपस्थित होत्या.या उपक्रमामुळे सौ.सुजाता मुंदडा-बिहाणी यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
——————————————————————————