सांगोला नगरपरिषदेअंतर्गत बचत गटातील महिलांसाठी दोन दिवसीय बचत गट संकल्पना प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न

सांगोला :

शहरातील दारिद्र्य रेषेखालील महिलांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टीने सांगोला नगरपरिषदेअंतर्गत
बचत गटातील महिलांसाठी दि.३० व ३१ जानेवारी २४ रोजी आयोजित करण्यात आलेले दोन दिवसीय बचत गट संकल्पना प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न झाले.

शहरी दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सन २०१४-१५ पासून कार्यान्वीत झालेली दि.अं.यो.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (डीएवाय-एनयुएलएम) ही केंद्र पुरस्कृत योजना सांगोला नगरपरिषद राबवित असून या योजनेच्या माध्यमातून शहरातील दारिद्र्य रेषेखालील महिलांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टीने नगपरिषद स्तरावर महिला बचत गटांची स्थापना करण्यात येते.या अनुषंगाने सांगोला शहरामध्ये आज २०० पेक्षा जास्त बचत गट कार्यरत आहेत.या बचत गटांमध्ये महिलांचा बचत गट,सफाई कर्मचारी यांचा बचत गट तसेच दिव्यांग बांधवांच्या बचत गटांचा समावेश होतो.

सदर योजनेच्या माध्यमातून १० ते १५ बचत गटांचा मिळून एका वस्तीस्तर संघाची स्थापना करण्यात येते व दोन पेक्षा जास्त वस्तीस्तर संघ मिळून शहरस्तर संघाची स्थापना केली जाते.याप्रमाणे सांगोला शहरामध्ये ०१ शहरस्तर संघ व ९ वस्तीस्तर संघ कार्यरत आहेत. वस्तीस्तर संघ व शहरस्तर संघाबाबत संकल्पना स्पष्ट होण्याच्या दृष्टीने दि.३० व ३१ जानेवारी २४ रोजी बचत गटातील महिलांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.सदर प्रशिक्षणाचे उदघाटन नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर प्रशिक्षणासाठी पहिल्या दिवशी प्रशिक्षक म्हणून महेश साठे (पंचायत समिती, सांगोला) यांनी तर दुसऱ्या दिवशी उमेश डांगे (पंचायत समिती, मंगळवेढा) यांनी प्रशिक्षक म्हणून उपस्थित बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणामध्ये वस्तीस्तर संघ,शहरस्तर संघ व समुदाय संसाधन व्यक्ती असे एकूण ४० महिलांचे दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन नगरपरिषद सभागृह येथे करण्यात आले.सदर प्रशिक्षणामध्ये बचतगट,वस्तीस्तर संघ व शहर स्तर संघ संकल्पना, व्यवस्थापन व शाश्वत उपजीविका याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

        सदर प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सहा.प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे,समुदाय संघटक बिराप्पा हाके,शहर उपजीविका केंद्र व्यवस्थापक शरद थोरात व सौ.जयश्री खडतरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————————————

विविध शासकीय योजनांची माहिती नगरपरिषदेच्या वतीने नेहमी देणार :

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून महिला फक्त आर्थिकदृष्ट्याच नाहीतर, सामाजिक दृष्ट्याही सक्षम होण्याकरिता सांगोला नगरपरिषद ही नेहमीच विविध प्रशिक्षणाचे आयोजन करत असते. येथून पुढेही महिलांच्या विकासाकरिता विविध शासकीय योजनांची माहिती नगरपरिषदेच्या वतीने नेहमीच शहरस्तर संघाच्या माध्यमातून महिलापर्यंत पोहचविली जाईल.”
                                – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी
——————————————————————————