महत्वाच्या बातम्या

मोदी आवास योजनेतील घरकुलासाठी निधीची तात्काळ तरतूद करावी – दीपकआबा साळुंखे-पाटील

सांगोला :

निधीअभावी रखडलेल्या सांगोला तालुक्यातील मोदी आवास योजनेतील घरकुलांसाठी तात्काळ निधीची तरतूद करावी व सर्वसामान्य नागरिकांच्या रखडलेल्या घरकुलाच्या कामांना गती द्यावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी राज्याचे सहकार व गृहनिर्माण मंत्री नाम.अतुल सावे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सांगोला तालुक्यातील इतर मागास प्रवर्गातील १३९१ नागरिकांना मोदी आवास घरकुल योजनेतून घरकुल मंजूर आहेत.यापैकी सर्व १३९१ लाभार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये प्रमाणे पहिला हप्ता देण्यात आला आहे.तर,यापैकी ३७१ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता प्रत्येकी ४५ हजार रुपये तसेच १२७ लोकांना प्रत्येकी ४० हजार रुपये प्रमाणे तिसरा हप्ता देण्यात आला आहे.तर,फक्त २ लोकांना अंतिम २० हजार प्रमाणे हप्ता अदा करण्यात आला आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेसाठी निधीची तरतूद नसल्याने तालुक्यातील सर्व घरकुलांचे काम अर्ध्यावर रखडले आहे.प्रशासनाकडे निधी मागणीचे प्रस्ताव पाठवूनही संबंधित योजनेसाठी निधी नसल्याने मोदी आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत.ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी थेट राज्याचे सहकार व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यातील नागरिकांना रखडलेले अनुदान मिळण्याबाबत निवेदन दिले.यावेळी, त्यांचेसोबत प्रवीण नवले,विनायक मिसाळ,य. मंगेवाडीचे उपसरपंच अनिल पाटील आदी उपस्थित होते.
                   —————————————————————

मंत्रीमहोदयांनी दिले अनुदान देण्याचे आदेश :

दीपकआबांच्या निवेदनानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री नाम.अतुल सावे यांनी तात्काळ संबंधित विभागाला सूचना देऊन सांगोला तालुक्यातील सर्व रखडलेल्या घरकुलांना अनुदान देण्याचे आदेश दिले.गेली २ ते ४ महिने रखडलेला अनुदानाचा प्रश्न दीपकआबांच्या प्रयत्नातून मार्गी लागणार असल्याने मोदी आवास योजनेतील लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
———————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button