भारतीय डाक विभागाच्या सर्व सेवा लोकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे ध्येय – अधीक्षक चंद्रकांत भोर

 

सांगोला :

भारतीय डाक विभागाच्या बँकिंग सेवा,इन्शुरन्स सेवा, मेडिक्लेम इन्शुरन्स सेवा,इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेच्या सेवा आदी प्रकारच्या सेवा ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम पंढरपूर डाक विभागाच्या माध्यमातून केले जात असल्याचे प्रतिपादन पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक चंद्रकांत भोर यांनी डाक कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (DCDP) मध्ये सांगोला गुरुकुल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

भारत सरकारच्या पोस्टाच्या विविध बचतीच्या योजनांबाबत नागरिकांना अर्थसाक्षर करण्याच्या हेतूने दर महिन्यातून एक दिवस डाक कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.या कार्यक्रमासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मॅनेजर विनायक पासंगराव,मंगळवेढा डाक उपविभागाचे डाक निरीक्षक हनुमंत चव्हाण,सांगोला पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर सोमनाथ गायकवाड,सहा.पोलीस निरीक्षक खरात साहेब व मोरे साहेब तसेच सांगोला गुरुकुलचे संस्थापक,अध्यक्ष धर्मराज बोराडे व गाडेकर सर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना स.पो.नि.खरात साहेब व मोरे साहेब यांनी भारतीय डाक विभागाचे जनतेशी असणारे अतूट नाते संबंधांबाबत त्यांच्या आयुष्यातील आठवणी सांगून पोस्ट ऑफिसच्या आठवणी आणि सेवेची महती सांगितली. सांगोला पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर सोमनाथ गायकवाड यावेळी म्हणाले की,”आज बचत केलेला पैसा हा भविष्यात मिळवलेला पैसा असतो”.त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या योजनामध्ये पैसे गुंतवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे,असे आवाहन केले.तसेच ते पुढे म्हणाले की,महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र योजना,मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना,मुलांसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड,सर्व प्रकारच्या बचतीचे व्यवहार करण्यासाठी पोस्ट ऑफिस बचत खाते आणि इंडिया पोस्ट पेमेंटचे डिजिटल बँकिंगचे खाते याबाबत माहिती सांगितली. बचतीचे आणि गुंतवणुकीचे महत्त्व विशद करत,जीवन व्यवहारातील उदाहरणे देत मानवी जीवनामध्ये भविष्यात येणार्‍या आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचे फायदे सांगून पोस्ट ऑफिसचा डाक विमा आणि ग्रामीण टपाल जीवन याबाबतही त्यांनी विवेचन केले.

त्याचबरोबर मंगळवेढा डाक विभागाचे निरीक्षक हनुमंत चव्हाण यांनी मंगळवेढा व सांगोला तालुक्यात असणाऱ्या पोस्टाच्या गांवापर्यंत पोहोचलेल्या नेटवर्कच्या माध्यमातून पोस्टाच्या सेवांचा लाभ नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन केले.या कार्यक्रमास सांगोला गुरुकुलचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाक आवेक्षक राम कुलकर्णी व संतोष खाणे यांनी परिश्रम घेतले.
—————————————————————————