महत्वाच्या बातम्या

सांगोला नगरपरिषद आयोजित ‘स्वनिधी से समृद्धी’ योजनेला पथ विक्रेत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी

 

सांगोला :

             सांगोला शहरातील पथ विक्रेत्यांनी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबास सुरक्षित करावे तसेच या योजनेपासून वंचित असलेल्या आपल्या सोबतच्या इतर पथ विक्रेत्यांना ‘स्वनिधी से समृद्धी’ या योजनेबद्दल माहिती द्यावी,असे सांगून सांगोला नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वनिधी से समृद्धी’ या योजनेला सांगोला शहरातील पथ विक्रेत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी दिली.

केंद्रशासनाच्या ‘स्वनिधी से समृद्धी’अंतर्गत ज्या पथविक्रेत्यांनी लाभ घेतलेला आहे.अशा पथ विक्रेत्यांसाठी ८ योजनांचा लाभ मिळणार असून याकरिता सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पथ विक्रेत्यांना एकाच ठिकाणी ८ योजनांची माहिती व लाभ मिळण्याकरिता गुरुवारी १० आॅगस्ट रोजी नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरास १६० हून अधिक पथ विक्रेत्यांनी सहभाग नोंदविला.

                           या शिबिराचे दरम्यान,माहिती देताना मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी म्हणाले की, कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर केल्याने पथ विक्रेत्यांचा रोजगार हिरावला. त्यांना उभारी मिळण्याकरिता केंद्र शासन पुरस्कृत ‘पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी’ या योजनेची सुरुवात करण्यात आली.या योजने अंतर्गत शहरातील भाजी,फळे,तयार खाद्यपदार्थ,चहा, भजीपाव, कापड, चप्पल,अंडी, उत्पादित वस्तू,चर्मकार, रस्त्यावरील केशकर्तनालय,पानपट्टी धारक इत्यादींना पुन्हा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळते भागभांडवलाचा पतपुरवठा केला जात असून राष्ट्रीयीकृत बँकेच्या सहकार्याने ही योजना राबविली जात आहे.

यावेळी मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या हस्ते पथविक्रेत्यांना वार्षिक २० रुपये व ४३६ रुपये पर्यंतचे विमा संरक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच केंद्र शासनाच्या ८ योजनांचा लाभ या दोन दिवसीय शिबिराच्या माध्यमातून घेण्याचे आवाहन नगरपरिषदेकडून पथ विक्रेत्यांना करण्यात आले.या कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक स्वप्नील हाके,बँक व्यवस्थापक दिविक अग्रवाल(SBI),दिपक गवळी (BOM),प्रमोद हंगार्गे(UBI),सागर माळी(BOI) याबरोबरच सर्व वित्तीय संस्थाचे बँकमित्र उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे यांनी केले तर,आभार समुदाय संघटक बिराप्पा हाके यांनी मानले.
—————————————————

पथविक्रेत्यांना केला विवीध बँकांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा :

सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) अंतर्गत शहरातील ३५८ इतक्या पथ विक्रेत्यांना प्रथम रक्कम रु.१० हजार तर,१४९ पथविक्रेत्यांना द्वितीय रक्कम रु.२० हजार व १८ पथ विक्रेत्यांना तृतीय रक्कम रु.५० हजार इतका कर्ज पुरवठा शहरातील विविध बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button