रमजान ईदपूर्वी इदगाहचे काम युध्दपातळीवर पूर्ण करावे – आमदार शहाजीबापू पाटील

 

सांगोला :

          सांगोला शहरातील मुस्लिम बांधवांचा सुमारे ५० वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित असणारा इदगाहचा प्रश्न आता मार्गी लागला असून संपूर्ण महाराष्ट्रात “क वर्ग” नगरपालिका असलेल्या शहरांपैकी सांगोल्यात सर्वात सुंदर व देखणे ईदगाह साकारत आहे,याचा मला सार्थ अभिमान असून अल्लाहने या पवित्र कामासाठी हातभार लावण्याची संधी मला दिली,याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो,असे सांगून या रमजान ईदची नमाज या नवीन ईदगाह मैदानावरच झाली पाहिजे, यासाठी रमजान ईदपूर्वी इदगाहचे काम युध्दपातळीवर पूर्ण करावे,अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी न.पा.चे प्रशासक तथा तहसीलदार व मुख्याधिकारी यांना मंगळवारी दिल्या.

आमदार शहाजीबापू पाटील यांनी अधिकारी व मुस्लिम समाजातील मान्यवरांसह मंगळवारी २८ मार्च रोजी इदगाह मैदानाच्या कामाला भेट देवून पाहणी केली. यावेळी ईदगाह मैदानाचे चाललेले काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाच्या मुस्लिम समाजाच्या ईदगाह मैदानाचे काम अत्यंत वेगात सुरु असून ईदगाह मैदानाच्या कामातील कुंपण भिंत, हॉल व निवासस्थानाची कामे पूर्ण झाली असून चबुतरे बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.येत्या १५ ते २० दिवसांमध्ये ही कामे पूर्ण करण्यात यावीत आणि येणाऱ्या रमजान ईदची नमाज या नवीन ईदगाह मैदानावरच झाली पाहिजे,यासाठी अपूर्ण असलेली कामे युद्ध पातळीवर पूर्ण करावीत व कामाची गुणवत्ता उत्तम प्रकारे राखण्यात यावी,अशा सूचना त्यांनी न.पा.चे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी व ठेकेदार धनाजी राऊत यांना दिल्या.

यावेळी तहसीलदार तथा प्रशासक अभिजीत पाटील,मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी,पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी,गटविकास अधिकारी आनंद लोकरे,माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ,हाजी शब्बीरभाई खतीब, माजी नगरसेवक दिलावरभाई तांबोळी,माजी नगराध्यक्ष रफिक तांबोळी,माजी नगरसेवक हाजी रफिकभाई तांबोळी व आलमगीर मुल्ला,हाजी युसूफभाई मुलाणी,उस्मान इनामदार,पोपट खाटीक, कमरुद्दीन खतीब यांचेसह नगर परिषदेचे इंजि.अभिराज डिंगणे, इंजि.आकाश करे, इंजि.मोईन इनामदार,ठेकेदार इंजि.राऊत तसेच मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
—————————————————————————