महत्वाच्या बातम्या

गणेशोत्सवातील महाप्रसादासाठी FDA नोंदणी बंधनकारक – डॉ.मंगेश लवटे

विनापरवाना आयोजन केल्यास कायदेशीर कारवाई

सांगोला :

गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळे व आयोजकांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद,जेवणावळी तसेच अन्नवाटपाच्या कार्यक्रमांसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) नोंदणी करणे बंधनकारक असून आवश्यक परवानगी व नोंदणी न करता महाप्रसादाचे आयोजन केल्यास संबंधित आयोजकांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद आहे,अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.मंगेश लवटे यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर,नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ अन्न मिळावे,यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.गणेश मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद व जेवणावळींची अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे.महाप्रसाद किंवा जेवणावळीचे आयोजन करणाऱ्या गणेश मंडळांनी festivals.mahafda.in या संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरुन FDA नोंदणी व परवानगी घ्यावी.नोंदणी प्रक्रियेबाबत अधिक माहिती किंवा मार्गदर्शन आवश्यक असल्यास अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.मंगेश लवटे यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

महाप्रसाद तयार करताना स्वच्छता,अन्नपदार्थांची सुरक्षित साठवणूक,स्वच्छ पाणी,स्वयंपाकाची जागा तसेच अन्न हाताळणाऱ्या व्यक्तींची स्वच्छता याबाबतच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तपासणीदरम्यान,अस्वच्छता किंवा अन्नसुरक्षा नियमांचा भंग आढळून आल्यास संबंधित आयोजकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.गणेशोत्सव हा भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असल्याने महाप्रसादाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये,यासाठी आयोजकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करुनच कार्यक्रमांचे आयोजन करावे,असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
                      =========================

गणेश मंडळांनी आवश्यक नोंदणी करुन परवानगी घ्यावी :

गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद व जेवणावळींसाठी FDA नोंदणी व परवानगी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सव आनंदाचा आणि भक्तीचा उत्सव आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन सुरक्षित व स्वच्छ महाप्रसादाचे आयोजन करणे ही आयोजकांची जबाबदारी आहे.त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी सहकार्य करुन आवश्यक नोंदणी व परवानगी घ्यावी.
                 – डॉ.मंगेश लवटे
(अन्न सुरक्षा अधिकारी,अन्न व औषध प्रशासन,सोलापूर)
==========================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button