सांगोला तालुक्याला यापुढे निधीची व पाण्याची कमतरता भासू देणार नाही – आम.शहाजीबापू पाटील

सांगोला :
सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वांना परिचित असून सांगोल्याची आत्तापर्यंतची ही दुष्काळी ओळख मी पुसून टाकणार आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करुन तालुक्याच्या विकास कामांसाठी लागणारा निधी तसेच पिण्याच्या पाण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी लागणारा निधी शासनाकडून खेचून आणून सर्व अपूर्णावस्थेत असलेल्या योजना या पूर्ण करणार असून यापुढे सांगोला तालुक्याला निधीची व पाण्याची कमतरता भासू देणार नाही,अशी खात्री आम.शहाजीबापू पाटील यांनी गांवभेटी दरम्यान दिली.
“आमदार आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत विवीध गांवातील अडीअडचणी व समस्या सोडवण्याच्या उद्देशाने बुधवारी १ फेब्रूवारी रोजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील हलदहिवडी,शिरभावी,संगेवाडी,सावे,
मेथवडे,मांजरी व बामणी या गांवांचा दौरा केला.
यावेळी आम.शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की,”गांवच्या विकासासाठी कधीच कोणी पक्षीय राजकारण करु नये. तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी कोणा एका पक्षाचा आमदार नसून मी संपूर्ण तालुक्याचा आमदार आहे. त्यामुळे विकासकामे करताना मी कधीच पक्षपातीपणा करत नाही. आम्ही पक्षपातीपणा करत नाही, तुम्हीही कोणी विकासाच्या कामात पक्षपातीपणा करु नये. यापुढे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून,सर्वांनी एकत्र येऊन काम करुया”,असे आवाहनही आम.शहाजीबापू पाटील यांनी यासमयी केले.
या गांवभेट दौऱ्याच्या वेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रुपनर,भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, तहसीलदार अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे,महावितरणचे उपअभियंता आनंद पवार,गटशिक्षणाधिकारी नाळे आदींसह विवीध पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
—————————————————————————
शिरभावी येथे सरपंचाच्या अनुपस्थितीबद्दल आम. शहाजीबापूंची नाराजी :
आम.शहाजी बापू पाटील हे माजी आमदार दिपकआबा व अधिकारी वर्गांसमवेत गांवभेटीचा दौरा करत शिरभावी या गांवात विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आले असता,गांवातील सरपंचच गायब असल्याचे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिरभावी गांवचे (बापूविरोधी पक्षाचे) सरपंच मुद्दामहून अनुपस्थित राहिल्याने आम.शहाजीबापू म्हणाले, “विकासात मी कधीच राजकारण करत नाही. माझ्याकडे कामासाठी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता आला तरी,मी फक्त कामाचा विचार करुन ते काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. आज गांवच्या विकासाबाबत चर्चेची व अडीअडचणीची बैठक आहे,तरीही सरपंच अनुपस्थित राहिले, ‘सरपंच काय कलेक्टर आहेत का ?” असा संताप व्यक्त करत आम.शहाजीबापू पाटील यांनी शिरभावीत आपली नाराजी व्यक्त केली. ———————————————————
गेल्या ५० वर्षात निधी मिळाला नाही,एवढा निधी या दोन वर्षात मिळाला :
सांगोला तालुका हा नेहमीच दुष्काळी तालुका म्हणून गणला गेला. शेतीच्या पाण्याचा प्रश्न असो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा तालुक्याच्या विकासाचा प्रश्न असो,हा तालुका विकासापासून सतत वंचित राहिला.तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा कायमच विरोधी बाकावर बसणारा असेल तर,सत्ताधारी शासन कर्त्यांकडून त्यांना निधी कसा मिळणार ? आता आम.शहाजीबापू पाटील हे सत्ताधारी गटाबरोबरच असल्यामुळे तालुक्यातील विवीध विकासकामांसाठी भरमसाठ निधी खेचून आणत असून गेल्या ५० वर्षात निधी मिळाला नाही,एवढा निधी या दोन वर्षात मिळाला. – दिपकआबा साळुंखे-पाटील
—————————————————————————