महत्वाच्या बातम्या

सांगोला नगरपरिषद येथे शहर कार्यकारी समितीची बैठक संपन्न

 

सांगोला :

 सांगोला नगरपरिषद ही केंद्रशासन पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबवित असून या अभियानाच्या माध्यमातून शहरातील गरीब नागरिकांना त्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये बचत गट स्थापना व सवलतीच्या व्याज दरात त्यांना कर्ज उपलब्ध करणे, सवलतीच्या व्याज दरात वैयक्तिक कर्ज प्रकरणे,शहरातील युवक- युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे,पथविक्रेत्यांना सहाय्य,पीएम स्वनिधी,बेघरांसाठी निवारा इ.घटकांच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचाविण्याचे प्रयत्न केले जातात.त्या अनुषंगाने, सांगोला नगरपरिषदेने शहर कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीत मुख्यधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांनी आजअखेर झालेल्या बँकेच्या कामाचा आढावा घेवून पुढील कामाचे नियोजन केले.

                     प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSVANidhi) या योजनेच्या माध्यमातून सांगोला शहरातील ५९७ पथविक्रेत्यांना विविध राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून कर्ज वितरीत करण्यात आले आहे. तसेच सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत शहरातील ६ उद्योजकांना ३५ टक्के अनुदानावर कर्ज वितरीत करण्यात आले आहे. त्याचबरोबर,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील १५ बचत गटांची व १० वैयक्तिक कर्ज प्रकरणे वितरीत करण्यात आलेली आहेत. याकरिता सांगोला नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या हस्ते शहरातील बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ महाराष्ट्र,युनियन बँक ऑफ इंडिया व लोकमंगल सह.बँक यांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ.सुधीर गवळी यांनी पुढील काळातही बँकांनी बचत गट, पथ  विक्रेत्यांना व नव उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम करण्याचे आवाहन केले.

सदर बैठकीस सांगोला नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक स्वप्नील हाके,लेखापाल जितेंद्र गायकवाड, लेखा परीक्षक धनाजी साळुंखे,विद्युत अभियंता प्रभाकर कांबळे तसेच बँक व्यवस्थापक दीपक  गवळी,अविनाश शिंदे,प्रवीण खटकाळे,सागर माळी, प्रवीण भोसले,शिक्षण विस्तार अधिकारी डी.डी. गायकवाड,कोळी,आरोग्य सहाय्यक,सौ.सुनंदा घोंगडे (अध्यक्ष, कर्तव्य शहरस्तर संघ),सौ.मनीषा हुंडेकरी (सचिव,कर्तव्य शहरस्तर),सचिन भोसले (प्रतिनिधी, ग्रामीण जीवनोन्नती अभियान),शरद थोरात इ.सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे यांनी केले तर,आभार समुदाय संघटक बिराप्पा हाके यांनी मानले.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button