सामाजिक

सांगोला येथील भारतीय स्त्री शक्ती संस्थेला राज्य महिला आयोगाचा राज्यस्तरीय पुरस्कार 

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

सांगोला :

ग्रामीण भागात महिलांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सांगोला येथील भारतीय स्त्री शक्ती संस्थेला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर,प्रभादेवी येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी,महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपालीताई चाकणकर,मा.आमदार ॲड.मनीषा कायंदे,रवींद्र नाट्यमंदिरच्या संचालिका मृणाल जोगळेकर तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

हा पुरस्कार भारतीय स्त्री शक्ती,सांगोला शाखेच्या अध्यक्षा ॲड.राजेश्वरी केदार,सचिवा वसुंधरा कुलकर्णी व सहसचिवा डॉ.चित्रा जांभळे यांनी स्वीकारला.भारतीय स्त्री शक्ती,सांगोला शाखेच्या अध्यक्षा ॲड.राजेश्वरी केदार, उपाध्यक्षा मनीषा भोसेकर,सचिवा वसुंधरा कुलकर्णी, कोषाध्यक्ष शालिनी कुलकर्णी व सहसचिवा डॉ.चित्रा जांभळे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कार्य जोमाने सुरु असून या सन्मानामुळे ग्रामीण महिला सक्षमीकरणाच्या कार्याला अधिक प्रेरणा मिळणार असल्याची भावना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
                    ==========================

भारतीय स्त्री शक्ती,सांगोला या संस्थेच्या सातत्यपूर्ण व पारदर्शक कार्याची दखल घेऊन राज्य महिला आयोगाच्या वतीने पुरस्कार प्रदान :

भारतीय स्त्री शक्ती,सांगोला ही अराजकीय, स्वयंसेवी व राष्ट्रीय स्तरावरील महिला संघटना असून तिची सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शाखा ही १ जून २००४ पासून ग्रामीण व दुष्काळग्रस्त भागात महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे.संस्थेची मूळ स्थापना सन १९८८ मध्ये झाली असून सांगोला तालुका व सोलापूर जिल्ह्यातील महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.संस्थेच्या माध्यमातून शिक्षण व कौशल्य विकास,मानसिक व शारीरिक स्वास्थ्य,आत्मसन्मान वृद्धी,आर्थिक आत्मनिर्भरता आणि स्त्री-पुरुष समानता या पंचसूत्री तत्त्वांवर आधारित कार्य केले जाते.

संस्थेचा प्रमुख उपक्रम म्हणजे “मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र-सांगोला” हे १ जून २००४ पासून कार्यरत आहे.या केंद्रामार्फत आजपर्यंत ३ हजार १६५ पेक्षा अधिक प्रकरणांची नोंद झाली असून यापैकी सुमारे ९० टक्के प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात यश आले आहे.आठवड्यातून सहा दिवस येथे सेवा दिली जाते.घरगुती हिंसा,पती-पत्नी मतभेद,पालक व मुलांमधील संघर्ष तसेच युवकांच्या समस्यांवर समुपदेशक,वकील,डॉक्टर व पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून मार्गदर्शन केले जाते. याशिवाय संस्थेमार्फत महिला आरोग्य जनजागृती अभियान,तपासणी शिबिरे, किशोरवयीन मुलींसाठी कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणाबाबत जनजागृती,मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन तसेच ग्रामीण आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात.किशोर-किशोरी विकास कार्यक्रमा अंतर्गत शाळा व महाविद्यालयांमध्ये भावनिक व मानसिक आरोग्य,सायबर सुरक्षितता,लैंगिक शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास या विषयांवर मार्गदर्शन केले जाते.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला “तेरे मेरे सपने” विवाहपूर्व संवाद प्रकल्प हा संस्थेचा विशेष उपक्रम असून त्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन, स्त्री-पुरुष समानता,वैवाहिक जबाबदाऱ्या,संवाद कौशल्य आणि कौटुंबिक हिंसा प्रतिबंध याबाबत तरुणांमध्ये जनजागृती केली जाते.संस्थेमार्फत बालविवाह प्रतिबंध,महिलांवरील अन्यायाविरुद्ध निवेदने, ग्रामस्तरीय महिला जनजागृती तसेच पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत यांच्याशी समन्वय साधून सामाजिक हस्तक्षेप करण्यात येतो.या सर्व कार्यामुळे ग्रामीण महिलांमध्ये कायदेविषयक जागरुकता वाढली असून अनेक कुटुंबांचे विघटन टळले आहे. महिलांना न्यायप्रवेश सुलभ झाला असून किशोरवयीन मुलींमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आहे.सामाजिक सलोखा व स्त्री-पुरुष समतेला चालना देण्यात संस्थेचे कार्य महत्त्वाचे ठरले आहे.संस्थेच्या या सातत्यपूर्ण,पारदर्शक व परिणामकारक कार्याची दखल घेऊन जागतिक महिला दिन – २०२६ निमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संस्थेला हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केला. ==========================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button