सांगोला नगरपरिषदेमार्फत ‘ज्येष्ठ नागरिक दिन’ उत्साहात साजरा

 

सांगोला :

१ ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ जगभर “ज्येष्ठ नागरिक दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सांगोला नगरपरिषदेमार्फत ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करुन तसेच ज्येष्ठांसाठी ‘विरंगुळा केंद्राचा’ शुभारंभ करुन ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे प्रमुख घटक आहेत. भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांना आदराचे स्थान आहे. समाजाच्या जडणघडणीत त्यांनी दिलेल्या योगदानाचा व त्यांच्या अनुभवाचा सन्मान करण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात शनिवारी ज्येष्ठ नागरिकांना शाल व झाडाचं रोप देवून सांगोला नगरपरिषदेमार्फत त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रामदास भोसले तसेच राजेंद्र यादव,अरविंद केदार यांचेसह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी अजिंक्यतारा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डाॅ.नष्टे यांचेमार्फत उपस्थित ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.

नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ टक्के निधी राखीव ठेवणारी, सांगोला नगरपरिषद ही राज्यातील पहिली नगरपरिषद असून या ३ टक्के निधीतून नगरपरिषदेमार्फत शहरातील मिरज रोड पाण्याची टाकी व  वासुद रोड पाण्याची टाकी या २ ठिकाणी ज्येष्ठांसाठी “विरंगुळा केंद्र” उभारण्यात आले असून ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून या विरंगुळा केंद्रांचा शुभारंभही शनिवारी करण्यात आला.

ज्येष्ठ दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक श्रीमती अभिलाषा निंबाळकर व पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गंगाधरे यांनी केले तर, अभिलाषा निंबाळकर यांनी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानले.
—————————————————————————

     ज्येष्ठ नागरिकांसाठी भरीव कार्य करण्याचा मानस 

ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पात ३ टक्के निधीची तरतूद करणारी सांगोला नगरपरिषद ही राज्यातील पहिली नगरपरिषद असून या निधीतून उभारलेल्या विरंगुळा केंद्रांची आज सुरुवात करण्यात आली. भवितव्यातही ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरपरिषदेमार्फत भरीव कार्य करण्याचा मानस आहे.
    – मुख्याधिकारी,कैलास केंद्रे
—————————————————————————