मुंबईत आता लवकरच समुद्रातून भुयारी मार्ग काढत जाणारी बुलेट ट्रेन धावणार
मुंबई :
मुंबईत येत्या कांही वर्षात समुद्रातून भुयारी मार्ग काढत आता बुलेट ट्रेन धावणार असून तशी तयारी सुरु आहे. बीकेसी ते शिळफाटा या मार्गावरुन २१ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग बनवण्यासाठीची तयारी सध्या वेगात सुरु आहे.
देशातील पहिली हाय स्पीड ट्रेन अर्थात बुलेट ट्रेन चालवण्याची तयारी वेगात सुरु असून आतापर्यंत गुजरातमध्ये ज्या गतीने या प्रोजेक्टवर काम सुरु आहे, त्या तुलनेत महाराष्ट्रात जमिनीची उपलब्धता नसल्याने काम सुरु झालेलं नाही. तरीदेखील,मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी असून आता नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स भुयारी मार्ग स्टेशन आणि शिळफाटा दरम्यान २१ किलोमीटर लांबीचा भुयारी बुलेट मार्ग बनवण्यासाठी निविदा मागविल्या असून २० ऑक्टोबर २०२२ मध्ये निविदा उघडण्यात येणार आहेत.
या भुयारी मार्गात ठाणे खाडीखाली अंदाजे ७ किलोमीटर बोगद्याचा समावेश आहे. मुंबईतील जागेची अडचण पाहता भुयारी मार्गाद्वारे बुलेट ट्रेन धावणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल भुयारी स्थानक ते शिळफाटा असा बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भुयारी मार्ग असणार आहे.
: पहिला अंडर वॉटर भुयारी मार्ग :
मुंबईत बुलेट ट्रेनसाठी भुयारी मार्गाची तयारी सुरु करण्यात आली असून देशात बनणारा हा पहिला अंडर वॉटर भुयारी मार्ग असेल. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनुसार, बीकेसीच्या या अंडरग्राउंड स्टेशनमध्ये ६ प्लॅटफॉर्म असतील, ज्याची लांबी ४२५ मीटर असेल. हाय स्पीड ट्रेनसाठी १६ डबे असतील. १६ डब्यांनुसार प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहे. बीकेसी स्टेशनच्यावर आयएफएससी बनवण्यात येणार आहे. यासाठी इमारतीची उंची ६० मीटरपर्यंत असणार आहे.
: समुद्राखाली हा बोगदा कसा बनवला जाईल ?
हा बोगदा जमिनीपासून जवळपास २५ ते ६५ मीटर खोल असेल. तसंच सर्वात खोल बांधकाम शिळफाटाजवळ पारसिक टेकडीच्या खाली ११४ मीटर खोल असेल. हा बोगदा सिंगल ट्यूब बोगदा असेल, ज्यात अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांसाठी दुहेरी ट्रॅक असतील. या बोगद्याच्या बांधकामासाठी १३.१ मीटर व्यासाचं कटर हेड असलेलं टीबीएम वापरलं जाणार आहे. जवळपास १६ किलोमीटर बोगद्याच्या बांधकामासाठी तीन बोरिंग मशीन वापरल्या जाणार आहेत. इतर ५ कि.मी.चं काम न्यू ऑस्ट्रेयाई टनेलिंग पद्धतीद्वारे केलं जाईल.
: स्टेशनबाबत लवकरच निर्णय :
वांद्रे-कुर्ला संकुल हाय स्पीड रेल्वे स्टेशनच्या डिझाइन आणि निर्मितीसाठी, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसवरील एकमेव देशातील पहिल्या भुयारी बुलेट ट्रेन टर्मिनसचा आराखडा आणि बांधणीसाठी २२ जुलै २०२२ पासून निविदा मागवण्यात आल्या होत्या. निविदा पाठवण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२२ ठेवण्यात आली आहे. एका महिन्यानंतर प्रस्ताव आल्यानंतर लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती करून स्टेशन उभारणीची प्रक्रिया सुरु केली जाईल, अशी माहिती आहे.
: कसं असेल स्टेशन ?
हा भुयारी मार्ग पूर्ण करण्यासाठी जवळपास साडेतीन वर्षे कालावधी लागू शकतो. साधारणपणे २५ ते २६ मीटर खोलीवर हा बोगदा असेल, अशी माहिती आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, ग्राऊंड लेवलपासून जवळपास २४ मीटर खोलवर प्लॅटफॉर्म उभारले जाऊ शकतात. या स्टेशनवर तीन फ्लोअर असतील, ज्यात प्लॅटफॉर्म, स्टेशन परिसर आणि सर्विस फ्लोअर सामिल असेल.
: स्टेशनवर असणार या सुविधा :
स्टेशनमधून बाहेर पडण्यासाठी दोन प्रवेशद्वार असतील.यापैकी एक प्रवेशद्वार मेट्रो स्टेशनच्या लाइन 2 B शी कनेक्ट होईल. प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा दिली असेल,अशा पद्धतीने स्थानकाची रचना करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुरक्षा व्यवस्था,तिकिटींग,वेटिंग एरिया, बिजनेस क्लास लाउंज,रेस्ट रुम, स्कोकिंग रुम आणि चौकशी कक्ष अशा गोष्टी सामिल असतील. यामुळे भुयारी मार्गाच्या स्टेशनवर आल्यानंतर प्रवाशांना प्रवास करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, यादृष्टीने काम केलं जाणार असल्याची माहिती आहे.