रंगपंचमीनिमीत्त पिचकारी व विविध रंगांनी फुलली सांगोल्याची बाजारपेठ
सांगोला :
धुलिवंदनापासून सुरु झालेल्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी ५ दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी हा सण फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला साजरा केला जातो. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. एकमेकांंना रंंग लावून एक अनोखा आनंंदोत्सव रंगपंचमीदिवशी साजरा केला जातो. उद्या, रविवारी १२ मार्च रोजी रंगपंचमीचा सण असून या सणाच्या स्वागतासाठी सांगोला शहरातील बाजारपेठ ही पिचकारी व विविध रंगीबेरंगी रंगांनी फुलल्याचे चित्र दिसून येत आहे.
सांगोला शहरात सध्या सर्वत्र हलगीचा आवाज घुमत असून निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर किंवा एखाद्या मिरवणुकीवेळीच ऐकू येणारा हा हलगीचा आवाज तोंडावर आलेल्या रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सध्या ऐकावयास मिळत आहे.लहान मुले व चिमुकली बालके हातातील छोट्या हलग्या वाजवत रंगपंचमी दिवशी सामुदायिक रंग खेळण्यासाठी मोठ्या भावंडांकडून व गल्लीतील व्यापारी मंडळींकडून पैसे (चंदा) गोळा करताना दिसत आहेत. चिमुकली मुले हा सण साजरा करण्यासाठी पैशाची जमवाजमव करत असून पालकांनी खाऊसाठी दिलेले व साठवून ठेवलेले पैसे आता विवीध रंग उधळण्यासाठी वापरुन ही बालगोपालांची टीम रंगपंचमीचा खरा आनंद लुटणार, असेच दिसून येत आहे.
—————————————————————————