शैक्षणिक

भाई जगन्नाथराव लिगाडे यांच्या कार्याची उंची आभाळाएवढी – दिपकआबा साळुंखे-पाटील

 

सांगोला :

राज्याच्या राजकारणामध्ये लिगाडे घराण्याचे नांव खूप मोठे असून राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडी सरदार लिगाडे यांच्या वाड्यावरुन ठरत होत्या.सांगोला तालुक्यात राजकारण व समाजकारण करताना तात्यांनी गोरगरिबांची सेवा निस्वार्थीपणे केली, गोरगरिबांसाठी त्यांनी खूप कष्ट केले. आपल्या २५ वर्षाच्या राजकारणाच्या इतिहासात भाई जगन्नाथराव (तात्या) लिगाडे यांच्यासारखा प्रामाणिकपणे गोरगरिबांची सेवा करणारा व कष्ट करणारा चेअरमन आजपर्यंत मी बघितला नाही. म्हणूनच तात्यांनी जनतेच्या सेवेरुपी केलेल्या कार्याची उंची ही आभाळाएवढी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केले.

भाई जगन्नाथराव (तात्या) लिगाडे यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त स.शा.लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स (कृषी) यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपकआबा साळुंखे-पाटील,पद्मश्री राहीबाई पोपरे,उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्रीताई पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ. निकिताताई देशमुख, महिला सूतगिरणीच्या व्हा.चेअरमन कल्पनाताई शिंगाडे,भाई जगन्नाथराव लिगाडे (तात्या) चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रा.नानासाहेब लिगाडे व विद्यालयाचे प्राचार्य भाऊसो कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी पुढे बोलताना दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की,सांगोला तालुक्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात वाटचाल करत असताना तात्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. लिगाडे घराण्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच तालुक्यामध्ये काम चालू आहे आणि ते इथून पुढेही असेच चालू राहील.त्यामुळे,शाळेत शिकत असताना विद्यार्थ्यांनीही तात्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःचे उज्वल भविष्य घडवावे व विद्यालयाचाही नावलौकिक वाढवावा,असे मत दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी बोलताना पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपरे म्हणाल्या की, मी लहानपणापासूनच शेती केली. घरातच वडील शाळा शिकवत होते पण ते शिक्षणच नाहीतर, ज्ञान शिकवत होते. आयुष्यामध्ये कांहीतरी मिळवण्यासाठी लहानपणापासूनच मनात जिद्द आणि चिकाटी विद्यार्थ्यांनी बाळगायला हवी. बीजमाता व पद्मश्री होण्यासाठी आयुष्यामध्ये खूप खडतर प्रवास करावा लागला आहे. दुर्गम भागामध्ये बीज तयार करुन त्यापासून रोपे तयार केली.बचत गटाच्या माध्यमातून ३ हजार महिलांना काम दिले. हे बीज तयार करण्यासाठी डोक्यावर पाणी आणून रोपे जगवली. आयुष्यामध्ये खूप संकटाचा सामना केला आहे. या कार्याची दखल भारत सरकारने देखील घेतली. आजपर्यंत आयुष्यामध्ये खूप पुरस्कार भेटले परंतु,त्या पुरस्काराचा अभिमान वाटत नाही. कारण शेतकऱ्यांनी मातीला जपले पाहिजे, आरोग्याला जपले पाहिजे, पैसा असून चालत नाही.आरोग्य जपले तर आपली पुढील पिढी आरोग्यदायी घडेल. प्रत्येक गावात बी बँक तयार झाली पाहिजे.सकाळच्या डब्याला विषमुक्त भाजी आली पाहिजे. त्यामुळे मरेपर्यंत मातीची सेवा करत राहणार,मातीला कधी सोडणार नाही.माझ्यासारख्या राहीबाई प्रत्येक गांवामध्ये तयार झाल्या पाहिजेत.यासाठी लहानपणापासूनच विद्यार्थ्यांनी कोणाचा ना, कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवून आयुष्य घडवायला पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी झाडे लावा,झाडे जगवा,या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त झाडे लावावीत.जिथे निसर्ग जास्त आहे,तिथे पाऊस जास्त पडतो जे दिसायला चांगले असते, त्यात धमक नसते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पिकांवर औषधाची फवारणी न करता विषमुक्त माती व शेती करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे,असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील म्हणाल्या की,शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर टाळणे गरजेचे आहे. ज्या वयामध्ये शिक्षण घेऊन विद्यालयाचे, स्वतःचे आयुष्य घडवण्याचे वय आहे. त्या वयामध्ये आज मुले-मुली सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करत आहेत. आयुष्यामध्ये कोणते तरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी करिअर घडवायचे असेल तर व्हाॅट्सअप,फेसबुक,ट्विटर,इन्स्टा या गोष्टींपासून विद्यार्थ्यांनी लांब राहिले पाहिजे, तरच विद्यार्थ्यांची प्रगती होईल,असे डीवायएसपी राजश्रीताई पाटील यांनी सांगीतले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाई जगन्नाथराव लिगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे सदस्य प्रा. नानासाहेब लिगाडे यांनी केले. प्रास्ताविकात बोलताना प्रा. नानासाहेब लिगाडे म्हणाले की, माणसे काळाच्या पडद्याआड जातात, परंतु त्यांचे आचार-विचार जिवंत राहतात आणि ते आचार-विचार आपण जपायचे असतात. स.शा.लिगाडे व भाई जगन्नाथराव (तात्या) लिगाडे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समधील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल तसेच त्यांनी पाचवी ते बारावी मधील प्रथम,द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जि.प.सदस्य अशोक शिंदे, सरपंच मनीषा सुरवसे, माजी सरपंच भानुदास (अण्णा) खटकाळे, उपसरपंच गणेश शिंदे,दादाशेठ बाबर,सोमनाथ शिंदे, नंदकुमार शिंदे,योगेशदादा खटकाळे,सूर्याजी खटकाळे, बाळासाहेब आसबे, नवनाथभाऊ पवार,अनिल पाटील, रमेश जाधव,प्रा.कोळसे सर, समाधान शिंदे,इंजी.रमेश जाधव, वैभव केदार,स्कूल कमिटीचे सदस्य एम.डी.शिंदे, प्रा.आनंदराव खटकाळे तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी, सदस्य पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक,महिलावर्ग,पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. संभाजीराव शिंदे यांनी मानले. तर, सूत्रसंचालन डी.टी. घोरपडे यांनी केले.

—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button