नागपूर अधिवेशनात विरोधक फ्रंटफूटवर तर,सत्ताधारी बॅकफूटवर

 

नागपूर :
नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एनआयटी घोटाळ्याचे आरोप करुन विरोधकांनी या हिवाळी अधिवेशनाला जोरदार सुरुवात केली आणि अधिवेशनाच्या चालू आठवड्यात तर शिंदे गटाचे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या मंत्र्यांवर भूखंड घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी विरोधी पक्षाने सरकार विरोधात “टाळ कुटो व दिंडी आंदोलन” करत सत्ताधाऱ्यांचा धिक्कार केला.                                   “कुणी भूखंड घ्या..कुणी गायरान घ्या.. कुणी खोक्यानं घ्या..कुणी खोऱ्यानं घ्या.. तसेच कुणी गुवाहाटीला जा.. कुणी सुरतला जा..” असे अभंग गात व टाळ कुटत विरोधकांनी सत्ताधारी पक्षाविरोधात सूर लावला.या सर्व गदारोळामुळे नागपूर अधिवेशनात विरोधक फ्रंटफूटवर तर,सत्ताधारी बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वीच्या अधिवेशनात होत असलेल्या नुसत्या गोंधळामुळे विरोधी पक्षाला सूर गवसत नसल्याची टीका होवून, विरोधी पक्ष बॅकफूटवर जात असल्याची चर्चा होत होती.परंतु,गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एनआयटी घोटाळ्याचे आरोप केले व दुसर्‍या आठवड्यात शिंदे गटाचे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या मंत्र्यांवर भूखंड घोटाळ्याचे आरोप करुन त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी मजबूत फिल्डिंग लावल्याने यंदा मात्र विरोधक या अधिवेशनात फ्रंटफूटवर असल्याचं चित्र आहे. तर एकामागून एक घोटाळ्याचे आरोप होत असल्याने सत्ताधाऱ्यांचे टेन्शन मात्र वाढले असून उलट सत्ताधारी बॅकफूटवर गेले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^