जिल्ह्यातील शासकीय व गायरान जमिनीवरील सर्व अतिक्रमणे ३१ डिसेंबरपूर्वी सक्तीने काढा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय व गायरान जमिनीवर असलेली विवीध प्रकारची अतिक्रमणे ही तहसीलदार व पोलीस प्रशासनाची मदत घेवून येत्या ३१ डिसेंबरपूर्वी सक्तीने काढा, अशी तंबीच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना नुकतीच दिली आहे.
सोलापूर येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या जिल्ह्यातील सर्व तहसीलदार,सर्व गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम,भूमी अभिलेख, महावितरण इ.कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अतिक्रमणाबाबत वरीलप्रमाणे जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या.या बैठकीत अतिक्रमण काढण्याची रुपरेषाही सर्वानुमते ठरविण्यात आली.सदर बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार व तहसीलदार मोहाळे हे उपस्थित होते.
शासकीय व गायरान जागेवरील अतिक्रमण काढण्याचा,असा आहे आराखडा :
* २१ नोव्हेंबर रोजी अतिक्रमण काढण्या संदर्भात सर्व उपाययोजना करणे. * २८ नोव्हेंबर रोजी सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यात येणार. * आढावा घेण्यासाठी तालुकास्तरावर समिती गठीत करणे. * तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांची नावे,गट नंबर,क्षेत्राबाबत व इतर तपशील यांची गांवनिहाय यादी संकलन करणे. * उच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाप्रमाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अधिनस्त सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी गायरान जमिनीबाबत सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये कॅव्हेट दाखल करणे. * तालुकास्तरीय समितीने अतिक्रमण काढण्याबाबतचा गांवनिहाय आराखडा तयार करणे व सर्व ग्रामपंचायतींना माहिती देणे तसेच हा आराखडा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा प्रशासनाला सादर करणे. * २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान अतिक्रमण धारकांना नोटीसा देणे व गांवपातळीवर घोषणा करणे. * ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान संबंधित तालुकानिहाय समितीने ग्रामपंचायतला पोलीस बंदोबस्तासह अतिक्रमण काढणेसंदर्भात आवश्यक ती साधन सामुग्री उपलब्ध करुन देणे आणि अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरु करणे.—————————————————————————