पोलीसांनी लोकप्रतिनिधींबरोबर योग्य तो समन्वय ठेवूनच काम केले पाहिजे – नाम.राधाकृष्ण विखे-पाटील

 

मंगळवेढा :

                   लोकप्रतिनिधी हे जनतेतून निवडून येतात त्यामुळे, जनतेचे प्रश्न व त्यांच्या समस्या सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य ठरते आणि हे कर्तव्य पूर्ण करण्याकरिता त्यांना प्रशासकिय यंत्रणेचीही तेवढीच आवश्यकता असते. त्याकरिता, पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी लोकप्रतिनिधींच्या बरोबर योग्य तो समन्वय ठेवूनच काम केले पाहिजे, असे मत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवेढा येथील नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.

मंगळवेढा येथील नुतन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे उदघाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.राधाकृष्ण विखे-पाटील यांचे हस्ते गुरुवार दि.१७ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले. यासमयी,आम.समाधान आवताडे,आम.सुभाष देशमुख,आम.सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, तहसीलदार स्वप्नील रावडे तसेच मंगळवेढा उपविभागातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाम.विखे-पाटील म्हणाले की, अलिकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठलीही बातमी सगळीकडे लगेच कळते.पण,त्यावर लगेच विश्वास न ठेवता अशा बातमीची लोकांनी सत्यता पडताळणी केली पाहिजे. पोलिसांना आता अत्याधुनिक शस्त्रे दिली जात असल्यामुळे सायबर क्राईमचे अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत.सध्या, भीमा नदीतून बेसुमार वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी वरचेवर येतात, याला अटकाव करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत. याबाबतीत पोलीस अधीक्षक यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी विशेष मोहीम राबवावी,अशा सूचना नाम.विखे-पाटील यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी बोलताना आम.समाधान आवताडे म्हणाले की, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयानंतर आता चोखामेळा चौक हळूहळू रिकामा होत आहे. पण, सगळी शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आली पाहिजेत,असा शासनाचा नियम असल्याने हे कार्यालय इकडे आले. यापूर्वीचे सेवानिवृत्त झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय जगदाळे व आताच्या विद्यमान उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या पुढाकाराने हे कार्यालय सुरु झाले आहे, असे ते म्हणाले.

यासमयी, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, धनश्रीचे संस्थापक,अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा,खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, सांगोल्याचे जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड, दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, भाजपचे शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकूल, मारुती वाकडे, रेवणसिध्द लिगाडे, बबलू सुतार, माजी नगरसेवक अजित जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवराज घुले, लहू ढगे, प्रा.निवृत्ती पवार आदी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती बालटे यांनी केले तर, शेवटी आभार अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी मानले.          —————————————————————————