राजकीय

पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांची पीडा, समस्या व दु:ख ऐकून घेतले तर,एकही आत्महत्या होणार नाही – खा.राहुल गांधी

 

शेगांव :

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याला आधाराची गरज आहे.पाऊस, अतिवृष्टी,दुषित वातावरण तसेच चक्रीवादळ अशा आपत्तीच्या काळात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते. पण, त्यांना भाजपा सरकार हे मदत करत नाही, नुकसान भरपाई देत नाही व पीकविमाही मिळत नाही. शेतकरी हे त्यांना आवश्यक असणारे ५० हजार ते एक लाख रुपयांचे कर्ज काढतात, पण ते माफ होत नाही आणि मोठ्या उद्योगपतींचे लाखो करोडो रुपयांचे कर्ज या सरकारकडून माफ होते. शेतकरी संकटात सापडतो व त्रस्त होतो, तेंव्हाच तो जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतो. मागे पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे कारकिर्दीत विदर्भातील शेतकर्‍यांच्या व्यथा व त्यांचे दु:ख कळताच तत्कालीन युपीए सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी केली.पण, आजचे सरकार शेतकर्‍यांचा आवाज ऐकत नाही. देशाच्या पंतप्रधानांनी व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांची पीडा, समस्या व दु:ख ऐकून घेतले तर, भविष्यात एकही आत्महत्या होणार नाही,असे प्रतिपादन काँग्रेसचे खा.राहुल गांधी यांनी शेगांव येथील विशाल जनसमुदायासमोर केले.

संत गजानन महाराज यांची पवित्र भूमी असलेल्या शेगांव येथे लाखो लोकांची उपस्थिती असलेल्या प्रचंड विशाल सभेसमोर खा.राहुल गांधी हे बोलत होते.यावेळी, सभेच्या व्यासपीठावर महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात,छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल,अ.भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक,माजी मंत्री यशोमती ठाकूर,आम.प्रणिती शिंदे, कन्हैयाकुमार तसेच देश व राज्य पातळीवरील काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे नेते तसेच इतर पक्षाचेही नेते उपस्थित होते. या सभेत खा.राहुल गांधींना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आणि त्यांना साथ देण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जमला होता.

याप्रसंगी बोलताना राहुल गांधी पुढे म्हणाले की, मागील आठ वर्षात देशात सामाजिक विषमता ही वाढीस लागली आहे. शेतकरी प्रचंड संकटात आहे, तरुण नोकरीच्या शोधात आहेत पण त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यांच्या समस्या कोणी ऐकत नाही. मुलांच्या शिक्षणावर पालकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. इंजिनिअरींगचे शिक्षण घेवूनही या सुशिक्षीत मुलांना एखादी खाजगी टॅक्सी चालवावी लागते किंवा इतर किरकोळ काम करावे लागते. पालकांनी मुलांच्या शिक्षणावर यासाठीच एवढा मोठा खर्च केला का ? तरुण व शेतकरी उघड्यावर पडले आहेत आणि दुसरीकडे याच हिंदुस्थानात कांही मुठभर लोकच श्रीमंत होतात, असा हिंदुस्थान नको आहे आणि आम्ही तो होऊही देणार नाही, असे यावेळी खा.राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.

कन्याकुमारीपासून ही पदयात्रा सुरु झाली असून जनतेचे ऐकून घेत आम्ही पुढे जात आहोत. मी तुमचे दुःख ऐकण्यासाठी आलो आहे. पण कांही लोक हिंसा,द्वेष व भिती पसरवण्याचे काम करत आहेत. भिती,हिंसा व द्वेष यामुळे नुकसान होते, प्रेम,बंधुभाव व अहिंसा यामुळे लोक एकसंघ होतात. विरोधक विचारतात की, देशात हिंसा,भीती व द्वेष कुठे आहे ? यासाठी विरोधकांनी जर रस्यावर उतरुन लोकांचा आवाज ऐकला तर मग कळेल की, द्वेष,हिंसा व भिती कुठे आहे ? द्वेष व हिंसेने देशाचा कधीच फायदा होत नाही.महाराष्ट्राची भूमी ही साधू, संत व महापुरुषांची भूमी आहे. त्यांनी लोकांना प्रेम दिले आणि लोकांना जोडण्याचे काम केले, आम्हीही तेच करत आहोत. आम्ही देश जोडण्याचे काम करत आहोत. ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात हिंसा अनुभवली आहे,ते द्वेष पसवत नाहीत. शेतकरी व कामगार यांच्या मनात द्वेष असूच शकत नाही. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असून शिवाजी महाराज व आपल्यांमध्ये खूप फरक आहे. ते महान होते, ते महाराष्ट्राचा आवाज होते. शिवाजी महाराज यांना त्यांच्या आई जीजाऊ यांनी मार्ग दाखवला, त्या मार्गाने ते गेले म्हणून ते छत्रपती बनले,असेही राहुल गांधी यासमयी म्हणाले.

याप्रसंगी,महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मराठीतून बोलताना म्हणाले की,सकाळी मी राहुल गांधी यांच्याबरोबर पदयात्रेत चाललो. राहुल गांधी हे सर्वसामान्य जनता,गरिब व पिडीत लोकांचे दुःख हलके करण्याचे काम करत आहेत, तर दुसरीकडे, पंतप्रधान मोदी ज्या रस्त्याने जातात तिथली गरिबी दिसू नये म्हणून, पडदे लावून गरिबीचे दृष्य झाकले जाते,हा फरक आहे. महात्मा गांधी हे सुद्धा गरिबांच्या झोपडीत जात असत. दांडी मार्चमध्ये महात्मा गांधी,मोतिलाल नेहरु,पंडित नेहरु हे सहभागी झाले होते आणि आज मलाही राहुल गांधींसोबत चालण्याचे भाग्य लाभले. भारत जोडो यात्रेवर विरोधक टीका करत आहेत. देश तुटला आहे का ? असा प्रश्न विचारणारे लोक देश तोडण्याची वाट पहात आहेत का ? असा सवाल करत, दृष्टा नेता तोच असतो ज्याला देश तुटण्याची चाहुल लागताच तो देश जोडण्यासाठी बाहेर पडतो. तुटल्यानंतर जोडण्याचे काम करण्याचे औचित्य काय ? असे स्पष्ट मत तुषार गांधी यांनी मांडले.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,जे जोडण्याचे काम करतात ते कायम राहतात, तोडणारे रहात नाहीत. खा.राहुल गांधी हे सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन कन्याकुमारीपासून श्रीनगर पर्यंत निघाले आहेत. ‘डरो मत’ असा संदेश देत राहुल गांधी लोकांना आश्वस्त करत आहेत. लोकांच्या जीवनात काळोख निर्माण करणारे लोक केंद्रात आहेत.पण,राहुल गांधी मात्र तुमच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम करत आहेत. देशाच्या तिरंग्याचे, संविधानाचे व लोकशाहीचे रक्षण राहुल गांधी करत आहेत. या कार्यात महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे त्यांनी सांगीतले.

भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, आजचा प्रसंग हा अविस्मरणीय आहे, एवढी प्रचंड सभा कधीच झाली नाही. या सभेला जमलेली ही उत्स्फुर्त गर्दी असून राहुल गांधी हे या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांचे अश्रू पुसण्याचे काम करत आहेत,आपुलकी,प्रेम व जिव्हाळा वाटत ते निघाले आहेत व हजारो लोकांच्या साथीने संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ते निघाले आहेत. स्वातंत्र्यांचे ७५ वे वर्ष साजरे करत असताना लोकशाहीवर घाला घालण्याचे काम सध्या केले जात असून भारताचे भविष्य उज्वल करण्यासाठी ही भारत जोडो यात्रा निघाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातच देश सुरक्षित राहील, त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, आजची ही प्रचंड सभा महाराष्ट्र व देशातील बदलणार्‍या परिवर्तनाचे संकेत असून भारत जोडो यात्रा ही आगळीवेगळी पदयात्रा आहे कारण, ही पदयात्रा हवेतून विमानाने निघालेली यात्रा नाही. महाराष्ट्रातून मध्यंतरी एक यात्रा गुजरात मार्गे गुवाहाटीला गेली आणि काय हाटील, काय डोंगार.. असे सर्व कांही त्या यात्रेला ‘ओके’ वाटले होते. पण,देशात व महाराष्ट्रात सध्या कांहीच ‘ओके’ नाही. या भारत जोडो यात्रेची कांही लोक टिंगल उडवत आहेत पण, त्याचा पदयात्रेवर कांहींही परिणाम होणार नाही. देशात आज बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा आहे. पदयात्रेत राहुल गांधी यांनी ह्या प्रश्नाला वाचा फोडताच, भाजपा सरकारकडून कांही हजार नोकर्‍यांचे नियुक्तीपत्र वाटले जात आहे,हे यापूर्वीच का झाले नव्हते ? असा प्रश्न आ. अशोक चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी,छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, कन्हैयाकुमार,यशोमती ठाकूर यांनीही आपले विचार व्यक्त केले. सभेसाठी उभे केलेल्या विशाल व्यासपीठावर वारकरी परंपरेचे दर्शन दाखवणारी छोटीशी दिंडी काढण्यात आली व राहुल गांधींनी यावेळी वारक-यांची पताका फडकवली.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button