माजी मंत्री आ.जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांकडून अटक
मुंबई :
‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा शो ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरु असताना आम.जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह या चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली होती.त्यामुळे, यानंतर आम.आव्हाड यांचेवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, घटनेच्या तीन दिवसांनंतर राष्ट्रवादीचे नेते आम.जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
अटकेनंतर केलेली फेसबुक पोस्ट व्हायरल :
आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.निकम यांचा फोन आला आणि “नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर, तुम्ही पोलीस स्टेशनला या”,असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी चांगुलपणाने म्हटलं की, “मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो”. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं.त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहर्यावर अस्वस्थ पणा व हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, “मी कांही करु शकत नाही,वरुन आदेश आले आहेत,तुम्हांला अटक करावी लागेल” अन् त्यांनी मला ताब्यात घेतलं”, “हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे, आता मी लढायला तयार आहे, फाशी दिली तरी चालेल.पण, मी जे केलेलं नाही, तो गुन्हा मी कबूल करणार नाही”, अशी फेसबुक पोस्ट आम. आव्हाड यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर केली आहे.
नेमकं काय घडलं होतं ?
ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरु झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो आ.जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घेऊन बंद पाडण्याचा प्रयत्न केला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना सिनेमागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने बाहेर काढल्याने वाद निर्माण झाला. या वादात कार्यकर्ते आणि प्रेक्षक यांच्यात झटापट झाली. यामध्ये एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. या प्रकरणावरुन ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडणे, जमावबंदी नियम तोडणे, प्रेक्षकांना मारहाण करणे,या विविध कारणांवरुन आ.जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता,या प्रकरणी त्यांना नोटीसही बजावण्यात आली होती.त्यानुसार, याच प्रकरणी शुक्रवारी दुपारी आम.जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
—————————————————————————