स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कामाचे १७ फेब्रुवारीला होणार भूमिपूजन – शहाजीबापू पाटील

ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांचेसह ना.शंभूराजे देसाई व ना.जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत होणार ३०० कोटींच्या कामाचा शुभारंभ

सांगोला :

               सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या सुमारे २२ गावांसाठी वरदायिनी असणारी व गेली २५ वर्षे मंजूरीच्या प्रतिक्षेत असणारी स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना (पूर्वीची उजनी उपसा सिंचन योजना) या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ३०० कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन व शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शुभहस्ते तसेच पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचेसह माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि.१७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता चिकमहूद येथे होणार असून भूमिपूजनाच्या कार्यक्रमासोबतच कार्यक्रमस्थळी शेतकरी मेळावाही आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.

          एकूण ८८४ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामांची निविदा विधानसभा निवडणुकीपूर्वीच प्रसिद्ध होऊन व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाचे आदेश देण्यात आले होते.परंतु, निवडणूक आचारसंहिता व मंत्रिमंडळ निवड यामुळे या कामाचे भूमिपूजन लांबले होते.कांही दिवसांपूर्वी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई व पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन या योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्याची विनंती केली होती.त्यानुसार,वरील सर्व मान्यवरांनी सोमवार दि.१७ फेब्रुवारी रोजी या योजनेच्या भूमिपूजन व शुभारंभ कार्यक्रमाला वेळ दिली असून सर्व मान्यवर हे हेलिकॉप्टरने महूद येथे येणार असल्याचे शहाजीबापू यांना कळविले आहे.

                 या योजनेचे काम सुरु होणार असल्याने २२ गावांमधील सुमारे १३ हजार ०५५ हेक्टर शेतजमिनींना बंदिस्त नलिकेद्वारे लवकरच कायमस्वरुपी शेतीला पाणी मिळणार असल्याने सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरुपी संपणार असून पुढील टप्प्यातील उर्वरित कामांनाही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
——————————————————————————

स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेची पार्श्वभूमी :

या योजनेला सन २००० साली ७८.५९ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती.परंतु,पुढील ५ वर्षे या योजनेवर कोणताही खर्च झाला नसल्याने २००५ साली या योजनेची प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली होती. नंतर,सन २०१९ साली आमदार झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरु केला.शासनाकडून या योजनेचे स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना, सांगोला असे शहाजीबापूंनी नामकरण मंजूर करुन घेतले व या योजनेमध्ये नव्याने १० गावांचा समावेश करुन प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एकूण २२ गावांना या योजनेच्या २ टीएमसी पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करुन २७ फेब्रुवारी २०२४ रोजी ८८३.७४ कोटी रुपयांच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यास आमदार शहाजीबापू पाटील यांना यश मिळाले.