सांगोला ग्रामीण रुग्णालयाला मिळाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा – आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला :
श्रेणीवाढ करुन सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा,यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांची सातत्याने भेट घेऊन पाठपुरावा केल्यामुळे माझ्या या पाठपुराव्याला यश आले असून सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे ३० खाटांवरुन ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक विशेष बाब म्हणून श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.या निर्णयामुळे नागरिकांना तात्काळ व परिपूर्ण आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
सांगोला येथे ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय असून लोकसंख्येचा विचार करता रुग्णांना मिळणारी आरोग्य सुविधा लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत होती.त्यामुळे सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या परिपूर्ण सुविधा देण्याच्या दृष्टीने आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्याकडे गाठीभेटी घेऊन सांगोला ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला.त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगोला ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला आहे.या उपजिल्हा रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आता सांगोल्यातच विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.
———————————————————
रुग्णालयाला अद्यावत उपकरणे व यंत्रसामुग्री पुरविली जाणार :
सध्या सांगोला ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांची सुविधा उपलब्ध असून आता उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला मिळाल्याने ५० खाटांची सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव अरविंद मोरे यांनी याबाबतचा शासनादेश काढला असून सदर ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करुन तेथे बांधकाम व पदनिर्मिती करण्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे. २५ सप्टेंबर २०१९ मधील तरतूदींनुसार उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडे सादर करण्यात येणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया,स्त्री व प्रस्तुती रोग तज्ञ बालरोगतज्ञ,अस्थीरोग तज्ञ,नेत्र शल्यचिकीत्सक,दंत चिकित्सक,वैद्यकीय अधिकारी,अधिपरिचारिका, प्रयोगशाळा शास्त्रज्ञ,क्ष-किरण तंत्रज्ञ, इसीजी तंत्रज्ञ अशी नवीन पदे भरण्यात येणार आहेत.अद्यावत आयसीयू,ऑपरेशन थिएटर,प्रशासकीय विभाग, प्रयोगशाळा,कॅंटीन,रुग्णालयाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट तसेच विशेष अद्यावत उपकरणे व यंत्रसामुग्री पुरविली जाणार आहे.
———————————————————————