सांगोला :
राज्य सरकारच्या वतीने दुधाला जाहीर करण्यात आलेल्या प्रतिलिटर ५ रुपयाच्या अनुदानापासून वंचित असणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांना आता वाढीव ५ रुपयांचे अनुदान त्वरीत देण्याची मागणी अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री नाम.राधाकृष्ण विखे-पाटील यांची मुंबई येथे समक्ष भेट घेवून केली असता,”वंचित पशुपालकांना अधिकचे अनुदान देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही” व सकारात्मक प्रतिसाद नाम.विखे-पाटील यांनी दिल्याने वंचित पशुपालकांना दुधाचे वाढीव अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सांगोला तालुक्यातील घेरडी,पारे हंगीरगे सह अन्य गांवात पशुपालक शेतकऱ्यांनी किंवा दूध उत्पादक संस्थांनी अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक ऑनलाइन माहिती भरली होती.परंतु,सदरची माहिती चुकीची असल्याचे सांगून ती दुरुस्त करण्याच्या सूचना दूध उत्पादक संस्थांना देण्यात आल्या होत्या.दूध उत्पादक शेतकऱ्यांची दुरुस्त माहिती शासनाला सादर करुनही सांगोला तालुक्यातील हजारो दूध उत्पादक शेतकरी प्रति लिटर ५ रुपयांच्या वाढीव अनुदानापासून वंचित राहिले होते.याबाबत सांगोला तालुक्यातील दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांना भेटून आपल्या मागणीचे लेखी निवेदन दिले होते.तालुक्यातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तात्काळ राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन दीपकआबांनी या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती ना.विखे-पाटील यांना केली यावर राधाकृष्ण विखे-पाटलांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारच्या आगामी बैठकीत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
राज्यभर दुधाचे दर कमालीचे घसरल्याने पशुपालक शेतकरी आर्थिक अडचणीत आला होता. अशावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी राज्यात सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली होती.पशुपालक शेतकऱ्यांच्या या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर व माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.या भेटीनंतरच राज्य सरकारने पशुपालक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता.या अनुदानापासून वंचित असणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही आता अनुदान देण्याबाबत राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आश्वस्त केल्याने सांगोला तालुक्यातील पशुपालक शेतकरी सुखावला आहे.
———————————————————————
शेतकरी वर्गातून आनंद :
राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दुधाचे दर घटल्याने अडचणीत आला होता.शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडत असल्याचे लक्षात आल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे,ही मागणी सर्वप्रथम सांगोला तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली होती.त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्यातील पशुपालक व दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रु.याप्रमाणे वाढीव अनुदानाचा लाभ मिळाल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने