सांगोला पोलिसांनी महिन्याभरात शोधून दिले,गहाळ झालेले मोबाईल
सांगोला :
सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे विवीध ठिकाणाहून चोरीला गेलेले व गहाळ झालेले मोबाईल अवघ्या महिन्याभरात शोधून ते संबंधित तक्रारदारांना परत करण्याची मोलाची कामगिरी सांगोल्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीसांनी केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी १ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान एकूण ३२ मोबाईल गहाळ झाल्याच्या घटना घडल्या होत्या.सदर गहाळ झालेल्या मोबाईलचा सायबर पोलीस ठाणे यांचे मदतीने तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेवून गहाळ झालेल्यापैकी एकूण २२ मोबाईलचा शोध घेतला असता,त्यातील अंदाजे किंमत ३ लाख ५ हजार रुपये किंमतीचे एकूण १९ मोबाईल मिळून आल्याने ते मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांचे हस्ते नुकतेच तक्रारदारांना परत करण्यात आले.
सोलापुर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधिक्षक प्रीतम यावलकर, मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड तसेच सांगोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. युसुफ पठाण,पो.काॅ.रतन जाधव (दोघे सायबर पोलीस ठाणे) आणि पो.काॅ.शहाजहान शेख यांनी केली आहे.
तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले असून यापुढेही ज्यांचे मोबाईल गहाळ झाले किंवा हरविले असल्यास त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवावी,असे आवाहन सांगोला पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.
———————————————————————————