राजकीय

डाॅ.अनिकेतच्या उमेदवारीसाठी शेकापच्या डाॅ.बाबासाहेबांनी घेतली शरद पवारांची भेट

सांगोला :

            माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनाच उमेदवारी दिल्याने नाराज झालेले अकलूजचे मोहीते-पाटील आता शरद पवारांची ‘तुतारी’ हाती घेतील,असा कयास बांधला जात असतानाच, माढ्याची उमेदवारी ही राज्याचे माजी कृषिमंत्री व आपल्या राजकिय कारकिर्दीत नेहमीच शरद पवारांना साथ देणार्‍या स्व.गणपतराव देशमुखांचे नातू डाॅ.अनिकेत देशमुख यांनाच देणे कसे योग्य राहील,हे पटवून सांगण्यासाठी स्व.गणपतरावांचे दुसरे नातू व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी गुरुवारी राष्ट्रीय नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने आता महाविकास आघाडीकडून माढ्याच्या उमेदवारीची माळ अकलूजच्या मोहीते-पाटलांच्या गळ्यात पडणार ? की,शेकापच्या डाॅ.अनिकेत देशमुखांच्या गळ्यात पडणार ? याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

             लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या, माढा लोकसभा मतदारसंघात दिवसागणिक अनेक राजकिय घडामोडी घडत असून महिन्याभरावर येवून ठेपलेल्या या निवडणुकीत आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून जो तो वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत आहे.भाजपने यावेळी खा.निंबाळकरांना उमेदवारी देवू नये म्हणून,अकलूजच्या मोहीते-पाटलांनी केलेली मागणी धुडकावून भाजपने अखेर खा.निंबाळकरांचीच उमेदवारी जाहीर केल्यामुळे चवताळलेले मोहीते-पाटील पुन्हा फिरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आणि ‘तुतारी’ हाती घेवून खा.निंबाळकरांना घाम फोडणार,अशी चर्चा होत असली तरी मोहीते-पाटीलही पुढे सरकेनात आणि उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत सांगोल्याचे डाॅ.अनिकेत देशमुख,अभयसिंह जगताप, संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड आदी मंडळी ईच्छुक असली तरी,शरद पवारही कुणाची उमेदवारी जाहीर करेनात.त्यामुळे,महायुतीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अजूनही संभ्रमावस्थेतच आहेत.

दरम्यानच्या काळात,शेकापचे राज्याचे नेते आम.जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीकडून माढ्याची जागा शेकापला सोडावी,अशी मागणी केली होती. तेंव्हापासून सांगोल्याच्या डाॅ.अनिकेत देशमुख यांचे नांव चर्चेत आले.पण,मोहीते-पाटलांनी सुरु केलेल्या राजकिय हालचालीमुळे सर्वांचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडेच वेधले असले तरी,तेही लवकर निर्णय घेईनात.त्यामुळे,माढा मतदारसंघात असलेले स्व. गणपतरावांचे वलय लक्षात घेवून डाॅ.अनिकेत देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी,अशी आग्रही मागणी डाॅ. बाबासाहेब देशमुख यांनी शरद पवारांकडे केली आहे.
                   ————————————————————

* बंधूला खासदार करण्यासाठी डाॅ.बाबासाहेबांची धडपड :

विधानसभा निवडणूकीत तब्बल अकरा वेळा निवडून येवून विक्रम करणारे सांगोल्याचे आमदार स्व. गणपतराव देशमुख यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत आपले नातू डाॅ.अनिकेत यांना शेकापची उमेदवारी देवून आपला राजकिय वारस तालुक्यातील जनतेपुढे दिला होता.त्यावेळी डाॅ.अनिकेत हे अल्पशा मताने पराभूत झाले होते.

             अलिकडे,तालुक्यातील शेकापच्या मतदारांवर स्व.गणपतरावांचे दुसरे नातू डाॅ.बाबासाहेबांची मात्र,
डाॅ.अनिकेतपेक्षा चांगलीच पकड निर्माण होत आहे. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीवेळी घरातच स्पर्धा निर्माण होण्यापेक्षा आपल्या बंधूला खासदार करण्यासाठी डाॅ.बाबासाहेब देशमुख यांची धडपड चालू असल्याची चर्चा जाणकार मतदारांमधून केली जात आहे..
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button