कॅन्सर ही देशापुढील राष्ट्रीय समस्या – प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे
सांगोला :
भूक न लागणे,वजन झपाट्याने कमी होणे,तीन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला राहणे,अवयवांमध्ये जडपणा व शिथिलता जाणवणे,तोंडामध्ये लालसर पांढरे चट्टे येणे ही कर्करोगाची लक्षणे असून कॅन्सर ही देशापुढील राष्ट्रीय समस्या असल्याचे मत कॅन्सर संशोधक प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ,सोनंद व प्रथम युवा भवन यांचे संयुक्त विद्यमाने “महिलांमधील कर्करोग:कारणे, लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय” याविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने आम्रपाली बुद्ध विहार,सोनंद येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात सांगोला महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व कॅन्सर संशोधक डॉ.प्रकाश अरुण बनसोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे,माजी नगरसेवक किशोर बनसोडे व सोनंद गांवातील मान्यवर उपस्थित होते. प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व टाटा कॅन्सर हॉस्पिटल, खारघर (नवी मुंबई) च्या सहकार्याने महिलांमधील कर्करोगावर उपयुक्त असणाऱ्या सुरक्षित व प्रभावी औषधांचा शोध,याविषयी महत्त्वाचे संशोधन केले असून त्यांनी कॅन्सर विषयक जनजागृती व्याख्यानेही दिली आहेत.
या कार्यक्रमात बोलताना प्रा.डॉ. प्रकाश बनसोडे यांनी महिलांमधील स्तनांचा,गर्भाशयाचा व बीजाशयाचा कर्करोग तसेच तोंडाचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग या विविध प्रकारच्या कर्करोगांबाबत संभाव्य कारणे, प्रथमदर्शी लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत अतिशय सोप्या भाषेत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कॅन्सर होण्यासाठी संभाव्य कारणे विशद करत असताना त्यांनी जेनेटिक फॅक्टर्स त्याचप्रमाणे केमिकल फिजिकल व जैविक कार्सिनोजेन,ओनकोजेनिक विषाणू बाबत दैनंदिन जीवनातील अनेक सोपी उदाहरणे देत मार्गदर्शन केले.
कर्करोग टाळण्यासाठी आवश्यक नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब,निरोगी राहण्यासाठी व्यायाम व संतुलित आहार, तंबाखू,धूम्रपान,दारु,गुटखा,खैनी,पान मसाला, मशेरी इत्यादीचे सेवन व तपकीर ओढणे यासारख्या व्यसनांना प्रतिबंध,रजो निवृत्तीनंतर होणारे संप्रेरक बदल व घ्यावयाची काळजी याबाबत दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देत महत्त्व स्पष्ट केले.
बापूसाहेब ठोकळे यांनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार तरुणांसाठी उपलब्ध केलेल्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.तसेच नर्सिंग कोर्सच्या उपकरणां बाबत उपस्थितांना माहिती दिली. माजी नगरसेवक किशोर बनसोडे यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांची ओळख व सूत्र संचालन अनुप ठोकळे यांनी केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास सोनंद पंचक्रोशीतील महिला,पुरुष व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————————