सांगोला :
सर्वसामान्य शेतकरी,व्यापारी,दिनदलित,वंचित, शोषित,पीडित व कष्टकऱ्यांचे प्रश्न हे स्व.गणपतराव देशमुख मांडत असताना महाराष्ट्राचे विधान भवन स्तब्ध होत होते, शेवटच्या श्वासापर्यंत स्व.गणपतराव यांनी राजकारणाचे पावित्र्य जपले व आपल्या पूर्ण हयातीमध्ये जोपासले.स्व.गणपतराव देशमुख यांनी माझ्या सहित महाराष्ट्रातील अनेक नवनिर्वाचित आमदारांना सभागृहामध्ये कसे बोलावे ? कसे वागावे ? सभागृह हा लोकशाहीचा जिवंत आत्मा आहे, सभागृहात प्रश्न कसे विचारावेत ? याबाबत आम्हां तरुण आमदारांना २५ वर्षांपूर्वी मार्गदर्शन केले.स्व. गणपतराव देशमुख हेच माझे राजकीय गुरु असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आम.नाना पटोले यांनी
सांगोला येथे केले.
सांगोला येथे सकल लोणारी समाज बांधवांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषी मंत्री खास.शरद पवार तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आम.नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत कसबा पेठ,पुणे येथील विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले लोणारी समाजाचे पहिले आमदार रविंद्र धंगेकर यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते,याप्रसंगी,खा.शरद पवार यांनी स्व.गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत,सांगोला तालुक्याच्या विकासात गणपतरावांचे फार मोठे योगदान असून हे कधीही विसरुन चालणार नाही,असे प्रतिपादन करुन यावेळी महाराष्ट्र राज्य पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांना आपुलकीने जवळ घेत काळजीने विचारपूस केली व हातात हात दिला.

यावेळी,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे लोणारी समाज बांधवांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करताना म्हणाले की, सांगोला तालुका खरोखरच भाग्यवान असून संपूर्ण महाराष्ट्रभर सांगोला तालुक्याची कर्मभूमी ही स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नावाने ओळखली जाते.’सांगोला म्हंटलं की,गणपतराव’ असे समीकरण उभ्या महाराष्ट्राला माहीत होते आणि असे नेतृत्व तुम्ही दीर्घकालापर्यंत टिकवले,असे सांगून बहुजनांचा आश्रयदाता, आधारस्तंभ म्हणून स्व.गणपतराव देशमुख हे नेहमीच सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आम्हाला मार्गदर्शन करत असत.ते पुढे म्हणाले की,एकदा विधानसभेमध्ये बोलत असताना, मी सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत एक प्रश्न उचलून धरला तेव्हा स्व.गणपतरावांनी मला बोलावून माझ्या पाठीवर शाब्बासकी दिली आणि ‘नानाभाऊ तुम्ही छान बोललात’,असे सांगून प्रोत्साहन दिले.त्या शाब्बासकीची आठवण आजही माझ्या हृदयामध्ये आहे.सध्याच्या घडीला देशामध्ये राजकारणाचं दूषितिकरण चालू आहे.संपूर्ण भारत देशाला प्रेरणा आणि मार्गदर्शक ठरतील,असे वागणे व बोलणे स्व.गणपतराव देशमुख यांचे होते. एवढेच नव्हेतर, हिमालया एवढं कर्तृत्व असणारा माणूस मी माझ्या राजकीय जीवनामध्ये आजवर पाहिलेला नाही,हीच खरी स्व.गणपतरावांची कमाई आहे.सध्याच्या स्थितीला मात्र, सांगोल्याचं नांव घेतलं की,लोक टीव्ही बंंद करतात,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.खरच महाराष्ट्राला आणि देशाला स्व.गणपतराव देशमुख यांच्या राजकीय शिदोरीची गरज असल्याचे नानाभाऊ पटोले यांनी यावेळी ठासून सांगितले. यावेळी,आ.पटोले यांनी एक किस्सा सांगितला की, २००३ ला स्वर्गीय गणपतराव देशमुख हे त्यावेळच्या तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असताना सरकारमध्ये अचानक गडबड झाली.स्वर्गीय गणपतराव देशमुख हे सातारा येथील कार्यक्रमास गेले होते,त्यांच्याकडे त्यावेळी शासकीय गाडी म्हणून लाल दिव्याची अंम्बॅसॅडर कार होती. सत्ताबदलाची कुणकुण लागताच, सातारमध्येच सदरची शासनाची गाडी गणपतरावांनी सोडून दिली,असा हा स्वाभिमानी, दूरदृष्टी व बहुजनांचा कैवारी असणारा नेता,महाराष्ट्रामध्ये यापुढे कधीही होणार नाही. गणपतरावांच्या कर्मभूमीला येण्याचं मला भाग्य लाभले,त्यांच्या परिवाराला भेटण्याचे भाग्य लाभले. माईंना भेटून भारावून गेलो. इथून पुढील काळात अडचणीच्या व सुखदुःखाच्या काळात आपण स्व. गणपतराव देशमुख यांच्या परिवाराच्या पाठीशी उभा राहू,अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.शेवटी जाता जाता ‘बाबासाहेब,तुम्ही चांगलं काम करता,असंच अविरतपणे काम करा आणि स्व.गणपतराव यांचेसारखे नेतृत्व सांगोला तालुक्यात पुन्हा निर्माण करा,त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे,तरच स्वर्गीय आबासाहेबांना खरी श्रध्दांजली वाहिल्यासारखे होईल,असे मत नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केले.
—————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक