सांगोला :
पश्चिम महाराष्ट्रातील ५५ दुष्काळी तालुके हे आजही परंपरागत दुष्काळी म्हणूनच गणले जातात. त्यामुळे या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे होत असलेले हाल थांबावेत म्हणून,या ५५ दुष्काळी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करणे गरजेचे असून त्यासाठी भरीव पॅकेज मंजूर करुन दुष्काळी जनतेला न्याय द्यावा,अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे केली असल्याची माहिती खासदार रणजीतसिंह नाईक -निंबाळकर यांनी दिली.
खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आपली पत्नी अँड.जिजामाला नाईक-निंबाळकर,कन्या ताराराजे व इंदिरा राजे यांचेसह राजधानी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.यावेळी पंतप्रधान मोदी यांच्याकडे खा.नाईक-निंबाळकर यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली. पंतप्रधान मोदींशी झालेल्या चर्चेत यासमयी महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्र व तेलंगना या राज्यांत सध्या कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत वाद सुरू असून या वादात तेलंगना राज्य सरकार हे सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे हा प्रश्न निकाली निघावा,यासाठी केंद्रशासन स्तरावर प्रयत्न करावा,ही मागणीही केली.
तसेच कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना हा प्रकल्प मार्गी लावावा व विशेष योजना तयार करून पश्चिम महाराष्ट्रातील या ५५ दुष्काळी तालुक्यांसाठी पॅकेज देऊन हे सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत.त्याचबरोबर, राज्य सरकारने निरा-देवधर या प्रकल्पास निधीची तरतूद केली असून या प्रकल्पास आता केंद्र शासनाकडून निधीची तरतूद व्हावी व या दुष्काळी पट्ट्यातील हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा,अशीही मागणी केली. तसेच या दुष्काळी पट्ट्यातील धोम-बलकवडी हा प्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून आठमाही होणार आहे.तो बारमाही करण्यासाठी कांही योजना करता येईल का ? याचाही केंद्रस्तरावर विचार व्हावा,अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली आहे.
गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापुर या योजनेसाठी निधी दिला असल्यामुळे या प्रकल्पाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा दौरा करून कृष्णा -भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प लवकर मंजूर करावा. कृष्णा लवादाच्या निर्णयानुसार एका नदीच्या खोऱ्यातील पाणी दुसऱ्या नदीच्या खोऱ्यात वळवता येत नसल्याने कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना पूर्णत्वास आणण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करून यावर उपलब्ध पाणी वाटपाची फेररचना कृष्णा पाणी तंटा लवाद आयोगाच्या माध्यमातून करण्यात यावी,यासाठी या आयोगाचा अहवाल महत्त्वाचा आहे,ही बाबही खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पंतप्रधान मोदींच्या निदर्शनास आणून दिली व या आयोगावर त्यांनी लक्ष घालण्याची विनंती केली.हा प्रकल्प पूर्ण झाल्यास महाराष्ट्रातील ५५ दुष्काळी तालुके कायमस्वरुपी सिंचनाखाली येणार असून लाखो हेक्टर क्षेत्र बागायत होईल आणि दुष्काळ संपून या भागातील शेतकरी सधन व आर्थिक दृष्ट्या संपन्न होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल,असेही सांगीतले.
माढा लोकसभा मतदार संघातील फलटण-पंढरपूर रेल्वे बाबत तरतूद झाली असून हे ही काम लवकरात लवकर मार्गी लागावे,यासाठी संबंधित विभागास सूचना द्याव्यात आणि मतदार संघातील इतर विकास कामांना प्राधान्य द्यावे, अशीही विनंती खा.रणजितसिंह यांनी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे प्रश्न लवकरच मार्गी लावू,अशी सकारात्मक ग्वाही दिल्याने माढा मतदारसंघातील उर्वरित प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागतील,ही अपेक्षा वाढल्याने या भेटीदरम्यान खा.नाईक -निंबाळकर हे भावूक झाले होते.
—————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक