स्व.भाई गणपतराव देशमुख यांचे टेंभू विस्तारित योजनेचे स्वप्न सत्यात उतरणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगोला :

टेंभू विस्तारित योजनेमध्ये सुधारित १०९ गांवे घेण्यात आली असून,येत्या १५ एप्रिल पर्यंत त्याला मान्यता देण्यात येईल व नंतर प्रशासकीय मान्यतासुध्दा होईल. त्यामुळे,टेंभू विस्तारित योजनेचे स्व.भाई गणपतराव देशमुख यांचे स्वप्न सत्यात उतरणार,अशी माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,महाराष्ट्र विधानसभेचे जेष्ठ सदस्य व ज्यांनी सन १९६२ ते २०१९ अखेरपर्यंत महाराष्ट्र विधानसभा सभागृहाचे कामकाज पाहिले,असे सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते तथा हरित  क्रांतीचे जनक माजी मंत्री स्व.भाई गणपतराव देशमुख यांचा टेंभू विस्तारित योजनेच्या संदर्भात आवर्जून उल्लेख करावा लागेल,असे सभागृहाला सांगितले.स्व.गणपतराव देशमुख यांचे टेंभू योजनेसाठी खूप मोठे योगदान आहे. दुष्काळी सांगोला तालुक्याला पाणी मिळण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी संघर्ष केला.या टेंभू योजनेमध्ये एकूण सात तालुके असून त्यामध्ये,कराड,कडेगाव, खानापूर,आटपाडी,तासगांव,कवठेमंकाळ व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इत्यादी तालुक्यांचा टेंभू योजनेमध्ये स्वर्गीय आबासाहेबांच्या प्रयत्नाने त्यावेळी समावेश करण्यात आला. टेंभू हे गाव कराड तालुक्यामध्ये असून तेथून बंदिस्त पाईपलाईनद्वारे व उचल पाण्याद्वारे शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.या योजनेमुळे एकूण १
लाख १८ हजार ८५६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.एकूण ४५० किलोमीटरची ही योजना कार्यान्वित असून निश्चितपणाने ही योजना सध्या प्रगतीपथावर आहे.
दुष्काळी तालुक्यांना कायमस्वरुपी पाणी मिळावे,यासाठी स्वर्गीय आबासाहेबांनी आटपाडी येथे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक पाणी परिषदा घेतल्या. येत्या ८ ते १० महिन्यांमध्ये टेंभू योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचणार आहे. स्व.आबासाहेबांनी तत्कालीन जलसंधारण मंत्री गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस यांचा त्यावेळी आवर्जून सत्कार केला होता,याचीही आठवण त्यांनी सभागृहाला करुन दिली.विशेषत: सांगोला तालुक्यातील टेंभू योजनेमुळे नव संजीवनी मिळणार असून वंचित गांवांना शेतीसाठी व पिण्यासाठी लवकरच बंदिस्त पाईपलाईनद्वारे कायम स्वरुपी पाणी उपलब्ध होणार आहे आणि स्व.आबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार असल्याने सांगोला तालुक्याचे भाग्यच म्हणावे लागेल.
—————————————————————————