नागपूर :
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील कोट्यावधी रुपयांचा भूखंड हा बिल्डरांना केवळ २ कोटी रुपयांना दिल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर करण्यात आला असून याच प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि या घोटाळ्याची चौकशी व्हावी,या मागणीसाठी महाविकास आघाडीसह विरोधकांनी नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी तुफान गदारोळ घातला. तर दुसरीकडे, CM च्या चौकशीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाचे आम.प्रवीण दटके आणि नागोराव गाणार यांनीच दीड महिन्यांपूर्वी तारांकित प्रश्न टाकून यासाठी फिल्डिंग लावली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजप व विरोधकांनी मिळूनच खिंडीत गाठले असून मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरील अडचणी आता चांगल्याच वाढल्याचे दिसून येत आहे
मुख्यमंत्र्यांच्या चौकशीसाठी भाजपच्याच ३ आमदारांची फिल्डिंग :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना, गोरगरीब लोकांसाठी घरे देण्याच्या उद्देशाने नागपूर सुधार प्रन्यासच्या हरपूर येथील संपादित केलेल्या भूखंडात सुमारे १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप असून भूखंड घोटाळा प्रकरणातील चौकशीच्या मागणीसाठी भाजपच्या ३ आमदारांनी दीड महिने अगोदरच तारांकित प्रश्न टाकल्याचे बुधवारी उघड झाले. विशेष म्हणजे,यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आ.प्रवीण दटके व नागोराव गाणार या विदर्भातीलच आमदारांनी तारांकित प्रश्न टाकला आहे.
“मुख्यमंत्रीपदी पुन्हा फडणवीस यावेत”, ही बावनकुळे यांची मन की बात हे त्याचेच संकेत तर नाहीना ? :
देवेंद्र फडणवीस यांचं डिमोशन झाल्यानंतर आणि त्यांची इच्छा नसतानाही वरिष्ठांच्या मर्जीनुसार उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारावी लागल्यानंतर त्यांच्यात व मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरु असल्याची चर्चाही दबक्या आवाजात होत होतीच आणि त्यातूनही मागील आठवड्यातच चंद्रशेखर बावनकुळे यांनी “राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस यावेत”,अशी आपली “मन की बात” जाहीर केली होती. आता तर खुद्द बावनकुळे यांचेसह भाजपच्या ३ आमदारांनी मुख्यमंत्र्यांची चौकशी व्हावी, यासाठी अधिवेशनाच्या दीड महिने अगोदरच फिल्डिंग लावली होती, हे उघड झाले असून चंद्रशेखर बावनकुळेंचा या प्रकरणातला सहभाग लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांची चौकशी व्हावी, ही फडणवीसांचीच इच्छा आहे का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय ? :
एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना गरिबांसाठी घरं देण्याच्या उद्देशाने संपादित केलेला नागपूर येथील १०० कोटींपेक्षा अधिक किमतीचा भूखंड केवळ २ कोटी रुपयांत बिल्डरला दिल्याची धक्कादायक बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडकीस आणली आणि कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विद्यमान मुख्यमंत्र्यांवर केला. नागपूर शहरातील एकूण ८५ जमीन प्रकरणांमध्ये अनियमितता झाल्याने न्यायालयाला या मुद्द्याची गांभीर्याने दखल घ्यावी लागली. या ८५ प्रकरणांपैकी हरपूर परिसरातील १९ लाख ३३१ हजार ०२४ चौरस मीटर जमिनीचं एक प्रकरण आहे. ही जागा झोपडपट्टी पुनर्वसनाच्या उद्देशाने आरक्षित करण्यात आली असून यातील एकूण ४९ पैकी २३ भूखंड नियमित झाले आहेत. उर्वरित १६ भूखंडांच्या नियमितीकरणासाठीचा हा सारा खटाटोप आहे. त्यासाठी नासुप्र आणि नगरविकास खात्याकडे अर्ज करण्यात आले होते. एकंदरीत,नागपूर सुधार प्रन्यासच्या हरपूर येथील जमिनीचा वाद हा आता राज्यस्तरीय मुद्दा झाला असून या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक