सांगोला :
पुणे येथे संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाचे येत्या बुधवारी आयोजन करण्यात आले असून या अधिवेशनाचे उदघाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होत आहे.खा. श्रीनिवास पाटील हे या समारंभाचे अध्यक्ष आहेत तर, इंदोरचे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर व तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले हे या उदघाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत. बुधवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायं.७ या वेळेत पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील यांनी दिली.
या रौप्यमहोत्सवी अधिवेशनास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,खा. श्रीनिवास पाटील,श्रीमंत छत्रपती शाहू महाराज,ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे,प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा.मा.म.देशमुख, डॉ.जयसिंगराव पवार,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव,प्रसिध्द अभिनेते भरत जाधव, सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे,इंदोरचे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर,तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी, मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना जीवनगौरव पुरस्काराने तसेच अभिनेते अशोक समर्थ आणि लेखक अरविंद जगताप यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून शाल, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सायंकाळी ५:३० वाजता या अधिवेशनाचा समारोप करणार आहेत तर, कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे समारोप समारंभाचे अध्यक्ष आहेत.यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे,ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा.मा.म.देशमुख व डॉ.जयसिंगराव पवार यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव आणि प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे या समारंभात उपस्थित राहणार असून शाल, स्मृतिचिन्ह आणि व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
दिवसभर चालणाऱ्या या अधिवेशनात विविध महत्त्वपुर्ण चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. दु.१२ ते १:३० या वेळात संभाजी ब्रिगेडच्या ‘अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला’ या संकल्पनेवर आधारित “खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतरचा भारत आणि जग” या विषयावरील चर्चासत्र पार पडणार आहे. या चर्चासत्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सकाळ समूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड हे सहभागी होणार आहेत. दु.२:३० ते ३:३० या वेळात “एकविसावे शतक – स्टार्टअप्सचे युग” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, मिटकॉन फोरमचे संचालक गणेश खामगळ आणि प्रसिध्द अभिनेता निखील चव्हाण हे या परिसंवादात सहभागी होणार आहेत.
दु.३:३० ते सायं.५ या वेळात संभाजी ब्रिगेडच्या ‘मराठा कम्युनिटी बिजनेस कम्युनिटी’ या महत्वाकांक्षी धोरणाच्या अनुषंगाने “आरक्षणाकडून अर्थकारणाकडे” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. क्रेडाईचे राष्ट्रीय चेअरमन व प्रसिद्ध उद्योजक सतिश मगर, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे चेअरमन राजेंद्र पवार, सह्याद्री फॉर्म्सचे मॅनेजिंग डायरेक्टर विलास शिंदे, सिल्व्हर ज्युबिली मोटर्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर राजवर्धिनी जगताप आणि बिव्हीजी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर हणमंत गायकवाड हे चर्चासत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.संभाजी ब्रिगेडने तरुणांसाठी अर्थकारणाची चळवळ सुरु केली असून या अधिवेशनाच्या माध्यमातुन अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या अधिवेशनात सहभागी व्हावे,असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील यांनी केले आहे. याविषयी अधिक माहिती व नांवनोंदणीसाठी sambhajibrigade.org या संकेतस्थळाला भेट देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन