अखेर मशाल पेटली : अंधेरीच्या पोटनिवडणूकीत ऋतुजा लटकेंचा दणदणीत विजय

 

मुंबई :

       ऐन अंधेरी पोटनिवडणूकीच्या तोंडावर, शिवसेनेचे वर्षानुवर्षापासून असलेले ठाकरे गटाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले आणि नव्याने मिळालेल्या “मशाल” चिन्हामुळे ठाकरे गटाला पराभवाचा सामना करावा लागतो की काय ? अशी शंका व्यक्त केली जात असताना,भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची माघार, उद्धव ठाकरेंच्या सेनेला मुंबईत असलेली सहानुभूती व ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी केलेला प्रचार, या कांही बाबी ठाकरे गटाच्या पथ्यावर पडल्या त्यामुळे, अखेर मशाल पेटली आणि अंधेरीच्या पोटनिवडणूकीत ऋतुजा लटकेंचा दणदणीत विजय झाला. तसेच शिवसेनेत बंडखोरी होवून ठाकरे व एकनाथ शिंदे असे वेगवेगळे दोन गट तयार झाले तरी, शेवटी जनता ही ठाकरे गटाच्याच पाठीमागे असल्याचा एकप्रकारचा संदेशच अंधेरी पूर्वच्या या पोटनिवडणूकी द्वारे दिला गेला असल्याची चर्चा होवू लागली आहे.

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणूकीचा निकाल आज रविवारी जाहीर झाला असून या निवडणूकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना ६६ हजार २४७ मते मिळाली. विशेष म्हणजे, दुसर्‍या नंबरची १२ हजार ७७८ मते नोटाला मिळाली तर, राजेश त्रिपाठी यांना तिसऱ्या नंबरची फक्त १ हजार ५६९ मते मिळाली. ऋतुजा लटके यांच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मशाल चिन्हावर पहिला आमदार निवडून आणला असून मशाल चिन्हावरील हा विजय उद्धव ठाकरेंना राजकिय बळ देणारा ठरणार आहे. या विजयामुळे मुंबईतील जनता ठाकरे गटाच्याच पाठीमागे असल्याचा मेसेज आता राज्यभरात पोहोचेल तसेच मुंबई महापालिका निवडणुकीतही उद्धव ठाकरे गटाला याचा फायदा होईल.

मागील ४-५ महिन्यांपासून उध्दव ठाकरेंच्यासमोर अनेक संकटे उभी राहिली.एकीकडे एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या सुमारे ४० आमदारांनी केलेली बंडखोरी,त्यामुळे सत्ता गेली, मुख्यमंत्रीपद गेले आणि एकामागून एक सेनेचे शिलेदार साथ सोडून जावू लागल्याने उध्दव ठाकरेंची राजकिय वाट बिकट होत चालली होती. त्यातून पुन्हा मुंबईतील अंधेरी पूर्वचे सेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर जाहीर झालेली पोटनिवडणूक आणि
ऐन अंधेरी पोटनिवडणूकीच्या तोंडावर, शिवसेनेचे वर्षानुवर्षापासूनचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेल्यामुळे ठाकरे गटाला पराभवाचा सामना करावा लागतो की काय ? अशी शंका व्यक्त केली जात असतानाही, ठाकरे गटाची धगधगती मशाल पेटली आणि अंधेरीच्या पोटनिवडणूकीत ऋतुजा लटकेंचा हा एकतर्फी झालेला विजय ठाकरे गटाला दिलासा देणाराच ठरला आहे.
—————————————————————————