नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या सरकारने ७ हजार कोटी रुपये दिले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मंगळवेढा :

                  सध्या राज्यात अस्तित्वात असलेले भाजप व शिंदे गटाचे सरकार हे शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार असून या सरकारला शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणायचे आहे.त्यासाठी या सरकारने ६५ मि.मी. पावसाची अट न ठेवता सरसकट एनडीआरएफच्या दुप्पट मदत दिली व प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले असून पाऊस,पूर, पडझड इ.नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या सरकारने ७ हजार कोटी रुपये निधी दिला असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदूर (ता.मंगळवेढा) येथे केले.

              उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आवताडे शुगर ॲण्ड डिस्टिलरीज प्रा.लि.प्रकल्पाच्या प्रथम गळीत हंगाम शुभारंभावेळी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.यावेळी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यासमयी, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खास. जयसिद्धेश्वर महास्वामी, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील,आमदार सुभाषबापू देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,आम.सचिन कल्याणशेट्टी,आम.राजेंद्र राऊत,आम.राम सातपुते,आम.गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, चेअरमन संजय आवताडे तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, गुजरातच्या राज्यपालांच्या उपस्थितीत मागील काळात १० हजार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिले.खतांचे भाव,फवारणी भाव वाढले, उत्पादन खर्च वाढला, त्यामुळे नैसर्गिक शेतीतून उत्पादन घेण्यास सुरवात केली. सध्या शेतकरी शास्त्रीय पद्धतीने नैसर्गिक शेती करत आहेत.शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या शेतामध्येच तयार करेल.कांही विकत आणावे लागणार नाही,उत्पादनही वाढेल.त्यामुळे आगामी काळात नैसर्गिक शेती ही मोहीम स्तरावर राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या कांही निर्णयांमुळे आज देशात ऊस कारखानदारी जिवंत आहे. तसेच आपण मुख्यमंत्री असताना २ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले व त्यानंतर केंद्रानेही दिल्यामुळे साखर कारखानदारीला जिवंत ठेवण्याचे काम करण्यात आले. एफआरपीचे भाव गेल्या ८ ते ९ वर्षात जवळपास आठशे ते एक हजार रुपयांनी वाढले. कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी सक्षम केलं पाहिजे, त्यासाठी किमान आधारभूत किंमतीचा शासन निर्णय अंमलात आणला,असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की,साखरेच्या भावावर एकटा भारत नियंत्रण ठेवू शकत नाही.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्राझील मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन करतो, त्यामुळे भारतातील साखरेला भाव मिळू शकत नाही.म्हणून साखर कारखानदारी वाचविण्यासाठी उपपदार्थ निर्मितीवर भर दिला. इथेनॉल निर्मितीच्या माध्यमातून आमच्या उद्योगांची, कारखान्यांची, वाहनांची भूक शेतकरी भागवेल. अशा प्रकारची व्यवस्था प्रधानमंत्री मोदींनी निर्माण केली. इथेनॉलचे दर सातत्याने वाढवत नेले. यामुळे संपूर्ण कारखादारीला स्थिरता मिळाली आहे निर्यातीबाबतचे नियम,अनुदान,अन्य मदत, कर्जाचे पुनर्वसन असे अनेक निर्णय केंद्राने घेतल्याचे सांगीतले.

तसेच पुढे ते म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेलाही गती दिली असून जगद्‌ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक व संत चोखामेळा स्मारकाचा प्रश्नही मार्गी लावू. फलटण-पंढरपूर रेल्वेसाठी राज्याचा वाटा देण्याचे पत्र केंद्राला पाठवू, असेही ते म्हणाले.पंढरीचा पांडुंरग हा सर्वसामान्य माणूस,शेतकरी व कष्टकऱ्यांचा देव आहे. शेतकरी व कष्टकरी सुजलाम सुफलाम झाले पाहिजेत, त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी पांडुरंगाने आम्हाला शक्ती द्यावी, असे साकडे आज पांडुरंगचरणी घातल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदार समाधान आवताडे यांनी अडचणींवर मात करुन हा कारखाना सुरु केला. या माध्यमातून शेतकरी व कामगारांचा फायदाच होणार आहे, अर्थतंत्राचे चक्र सुरु राहते,सामान्य माणसाचे, शेतमजुराचे दिवस बदलतात. येत्या काळात शेतकऱ्यांची सेवा करण्याचे काम या कारखान्याच्या माध्यमातून होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यावेळी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न शासन करत आहे. साखर कारखाने चालवणे हे कष्टाचे काम असून आमदार समाधान आवताडे यांनी हे आवाहन स्विकारुन हा कारखाना सुरु केल्याबद्दल त्यांनी आम.आवताडे यांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला,साखर विक्रीचे दर गेल्या कांही वर्षात निश्चित केले. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर देता येणे शक्य झाले. केंद्र शासनाने इथेनॉल धोरण आणले म्हणून देशातील व राज्यातील साखर कारखानदारी टिकली, असे पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले.

याप्रसंगी,प्रास्ताविक करताना आमदार समाधान आवताडे यांनी स्थानिक प्रश्न मांडले.यावेळी कारखाना बॉयलर अग्नीप्रदीपन करुन मान्यवरांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली.शेवटी आभार ॲड. बाबूसाहेब पेटकर यांनी मानले. सदर कार्यक्रमास मंगळवेढा परिसरातील पदाधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————————