आटपाडी नगरपंचायत मुख्यालय हे पीएचसीच्या जागेतच साकारा – सादिक खाटीक

आटपाडी/प्रतिनिधी :
सर्वसमावेशक मध्यवर्ती ठिकाण म्हणून,आटपाडी एस.टी.स्टॅन्ड लगतच्या अनेक मोठाल्या इमारतीसह ७८ गुंठ्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निसर्गरम्य जागेतच आटपाडी नगरपंचायत मुख्यालयाचा कारभार सुरु करा,असे आवाहन आटपाडीचे ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रवादी (शरद पवार गट) ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केले आहे.
आटपाडी नगरपंचायत मुख्यालय हे पीएचसीच्या जागेतच साकारा,अशी आग्रही विनंती करणारे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री,मंत्री महोदयांसह अनेक आमदार व खासदार महोदयांना सादिक खाटीक यांनी नुकतेच पाठविले आहे. आटपाडी नगरपंचायतीच्या कार्यकक्षेतील ग्रामीण रुग्णालयाचे,उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाल्याने, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद होणार असल्याने,तेथील उपलब्ध होणाऱ्या ७८ गुंठे जागेच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीचे मुख्यालय आटपाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर उभारावे,या भुमीकेतून आपण सर्वांचे लक्ष वेधत असल्याचे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले.
आटपाडी तालुक्यातील यपावाडी,खांजोडवाडी, पुजारवाडी,देशमुख वाडी,मासाळवाडी,भिंगेवाडी, शेंडगेवाडी,मुढेवाडी,मापटेमळा या गावांचा एकत्रित आटपाडी ग्रामपंचायतीत समावेश असताना, सर्वांना सोयीचे,मध्यवर्ती ठिकाण म्हणून आटपाडीचे एस.टी. स्टॅन्ड आताच्या जागेत ६ दशकापूर्वी उभे केले गेले होते.आटपाडी नगरपंचायत होण्यापूर्वीच्या आटपाडी ग्रामपंचायतीच्या एकूण ६ प्रभागापैकी ४ प्रभागांसह नगरपंचायतीत नव्याने समाविष्ट झालेल्या भिंगेवाडी गावाला,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रशस्त,निसर्गरम्य जागेतला नगरपंचायतीचा कारभार सर्वमान्य,सर्वप्रिय, सर्वस्पर्शी,सर्वोत्तम आणि सर्वसोयीचा ठरु शकतो.
आटपाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सध्याच्या जागेपासून पुर्वेला १०० मीटर अंतरावर आटपाडीचे प्रशस्त एस.टी.स्टॅन्ड असून उत्तरेला १०० मीटर अंतरावर,आटपाडी तलावापासून आटपाडी गावाला वळसा मारुन गेलेले सुमारे ९० मीटर रुंदीचे आणि ३ कि.मी.लांबीचे भले मोठे सदैव रिकामे असणारे ओढ्याचे पात्र आहे.तर,या पीएचसीच्याच पश्चिमेला २ हेक्टर १३ आर.अर्थात ५ एकर १३ गुंठेचे क्षेत्र श्री.मंत्री महाराष्ट्र सेवा संघ,पुणे अर्थात खादी भांडार,आटपाडी यांचे आहे. आटपाडीचा सर्वात मोठा शनिवारचा आठवडा बाजार १०० मीटर वरील याच ओढा पात्रात भरत असल्याने सर्वच बाजारकरुंना प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या नगरपंचायत कारभाराचा सहज सुलभ लाभ होणार आहे.एस.टी.स्टॅन्ड पासून दीड कि.मी.अंतरावर भरणारा मार्केट यार्डातला शेळ्या-मेंढ्यांचा बाजार, पीएचसी लगतच्या ओढापात्रात अथवा खादी भांडारशी करार वगैरेचे सनदशीर सोपस्कार करुन खादी भांडारच्या ५ एकर १३ गुंठ्याच्या प्रशस्त जागेत आणणे अत्यंत व्यापक सोयी सुविधांचे आणि हजारोंच्या उपयोगाचे ठरु शकते.हा शेळ्या-मेंढ्यांचा बाजार खादी भांडारच्या आवारात अथवा लगतच्या ओढा पात्रात आल्यास आपल्या या बाजाराला राज्यभरातला सर्वात मोठा बाजार होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.
आटपाडीच्या नगरपंचायतीचे मुख्यालय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेत साकारल्यास तेथील सुस्थितीतील अनेक इमारतींचा फायदा नगरपंचायतीस होवू शकतो.आटपाडी शहराच्या ओढापात्राला लागून ७ फुट रुंदीची शतकापासून संरक्षक भिंत आहे.ही भिंत ओलांडून अनेकांनी ओढापात्रात शे-दोनशे फुटापर्यत प्रचंड अतिक्रमण करण्याचा सपाटा लावला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेत नगरपंचायत साकारल्यास नगरपंचायतीच्या नजरेखाली ही अतिक्रमणे येणार असल्याने या अतिक्रमणांना उध्वस्त करणे शक्य होणार आहे.
——————————————————————————
आटपाडी शहराला भुषणावह ठरणार :
आटपाडी शहराची मुख्य बाजार पेठ,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरापासून ३०० मीटरच्या आत येत असल्याने तसेच आटपाडी शहराच्या ७० टक्के नागरीकांच्या अर्थात शालेय विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यत सर्वांच्या सोयीचे ठिकाण पीएचसीचा परिसर ठरणार असल्याने तेथेच आटपाडी नगरपंचायतीचे मुख्यालय साकारणे तसेच नगरपंचायतीचे रुपांतर भविष्यात महानगरपालिकेत रुपांतरीत होईपर्यत पीएचसीचा परिसर विस्तारीकरणासाठी सोयीचा ठरणार आहेच.शिवाय आटपाडी शहराला भुषणावह ठरणार आहे.
– सादिक खाटीक