१ हजार कोटीच्या पतंजली फूड पार्कचे नागपुरात ९ मार्चला भव्य उदघाटन – सचिन ए.मुंदडा

विदर्भाच्या कृषी क्रांतीस नवा आयाम
नागपूर :
विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पतंजली योगपीठाने ऐतिहासिक निर्णय घेतला असून तब्बल १ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून नागपूरमध्ये ‘पतंजली फूड आणि हर्बल पार्क’ स्थापन केला जात असून त्याचा भव्य उदघाटन समारंभ ९ मार्च रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पतंजली योगपीठाचे संस्थापक बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण देखील उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती सचिन मुंदडा यांनी दिली.
विदर्भातील बहुतांशी सर्वच जिल्ह्यांत गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्यांच्या आत्महत्या सातत्याने वाढत आहेत.कर्जबाजारीपणा, नैसर्गिक संकटे आणि हमीभावाच्या अभावामुळे हजारो शेतकरी संकटात सापडले आहेत.याच पार्श्वभूमीवर, पतंजली योगपीठाने ‘शेतकर्यांच्या अर्थसक्षमीकरणासाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी’ हा मोठा निर्णय घेतला आहे.
हा प्रकल्प म्हणजे कृषी आधारीत उद्योगांचा विशाल संकुल आहे.येथे शेतकर्यांकडून मोठ्या प्रमाणात कच्चा माल खरेदी केला जाणार असून त्यावर प्रक्रिया करुन निर्यातही केली जाईल.यामुळे शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर मिळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल.या प्रकल्पामुळे अमरावती,अकोला, बुलढाणा,यवतमाळ,वर्धा, चंद्रपूर,गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांतील शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे.येथे जवळपास ५० हजार लोकांना थेट व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल.कारण हा प्रकल्प म्हणजे केवळ उद्योग नाही, तर हजारो कुटुंबांच्या उज्ज्वल भविष्याची हमी ठरणार आहे.
२०१६ मध्ये पतंजली योगपीठाने महाराष्ट्रात शेतकर्यांसाठी विशेष धोरण आखले होते.नागपुरातील हा प्रकल्प त्या धोरणाचा पुढील टप्पा आहे.स्वदेशी संकल्पनेला प्रोत्साहन देत बाबा रामदेव यांनी नेहमीच भारतीय शेतकर्यांच्या हितासाठी काम करण्याची ग्वाही दिली आहे.सध्या शेतकर्यांना त्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळत नाही,यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागते. परंतु,या प्रकल्पामुळे ‘शेतकर्यांच्या कष्टाला आता थेट पतंजलीचा मजबूत आधार मिळणार.त्यामुळे, दलालांची साखळी तोडली जाईल आणि शेतकर्यांचे उत्पन्न वाढेल.
——————————————————————————
९ मार्च रोजी होणार्या उदघाटन सोहळ्यास देशभरातील शेतकरी,पतंजली योगपीठाचे प्रमुख नेते आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण हे शेतकर्यांना मार्गदर्शन करतील.या प्रकल्पामुळे सेंद्रिय शेतीला चालना मिळेल, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होईल आणि पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन मिळेल.याद्वारे, पतंजली योगपीठाने विदर्भातील शेतकर्यांना नवा आत्मविश्वास देण्याचे ध्येय ठेवले आहे.‘पतंजली फूड आणि हर्बल पार्क’ हा विदर्भातील ‘विदर्भाच्या कृषी क्रांतीस नवी दिशा देणारा प्रकल्प’ ठरणार आहे. भारतीय शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पतंजलीचे हे धाडसी पाऊल विदर्भातील शेतकर्यांना एक नवी उमेद देईल. नागपूरसारख्या महत्त्वाच्या केंद्रातून हा प्रकल्प सुरु होत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या विदर्भातील शेतकर्यांसाठी हा प्रकल्प नवसंजीवनी ठरेल.