दीपकआबांच्या अविरत प्रयत्नामुळे अखेर होलार समाज आर्थिक विकास महामंडळास मंजूरी
नाम.अजितदादा आणि दीपकआबांचे ऋण समाज कधीच विसरणार नाही – शिवाजीराव जावीर
—————————————————————
सांगोला :
संपूर्ण महाराष्ट्रात विशेष करुन पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असणारा होलार समाज हा आजवर शासकीय सेवा सवलती पासून उपेक्षित राहिला होता.वास्तविक पाहता,हा समाज संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे ४० लाख इतक्या मोठ्या संख्येने आहे.परंतु या समाजाच्या चुकीच्या नोंदी लागलेल्या असल्यामुळे या समाजास कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ होत नव्हता.म्हणून होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे,ही अनेक वर्षांची मागणी होती.अखेर ही मागणी पूर्ण झाली असून यासाठी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे.होलार समाजाला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे होलार समाज कधीच ऋण विसरणार नाही,असे प्रतिपादन स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांनी केले.
यावेळी शिवाजीराव जावीर पुढे म्हणाले की,चर्मकार समाजाकरिता असणाऱ्या आर्थिक विकास महामंडळातून होलार समाजास आर्थिक न्याय देण्याचा देखावा यापूर्वी होत होता.परंतु यातून होलार समाजाचा कवडीचाही लाभ अथवा फायदा होत नव्हता.त्यामुळे या समाजाकरिता स्वतंत्र महामंडळ स्थापन व्हावं,ही या समाजाची सातत्याने मागणी होती. अनेकांचे उंबरठे झिजवूनही दारिद्र्यात खितपत पडलेल्या होलार समाजास न्याय मिळत नव्हता.अखेर समाजाच्या शिष्टमंडळाने माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर समाजाची व्यथा मांडली.यावेळी कोणत्याही परिस्थितीत होलार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्धार करुन दीपकआबांनी वारंवार पाठपुरावा केला.होलार समाजाची गेल्या अनेक वर्षांची ही मागणी कशी रास्त आहे,हे शासन दरबारी पटवून या समाजाची सद्य:स्थिती कथन केली.होलार समाजाच्या शिष्टमंडळाची दीपकआबांनी चार वेळा मंत्रिमहोदयांसोबत बैठक लावून होलार समाजाचा हा प्रश्न पोट तिडकीने मांडला. अखेर,मंत्रिमंडळाच्या अजेंड्यावर हा विषय आणण्यास दीपकआबांनी भाग पाडले.होलार समाज आर्थिक विकास महामंडळाचा प्रस्ताव तयार करुन मंत्रालयातील विविध टेबलवर अडकून पडलेल्या फाइल्स स्वतः जातीने लक्ष देवून या फाईल कोणत्याही त्रुटीविना कॅबिनेट समोर सादर करण्याकरिता प्रामाणिकपणे दीपकआबांनी प्रयत्न केले.केवळ आणि केवळ दीपकआबांच्या होलार समाजाप्रती असणाऱ्या तळमळीतूनच हा प्रस्ताव मंत्रिमंडळामध्ये मंजूर झाला आहे. यामध्ये आबांच्या सततच्या आग्रहास्तव राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री नाम.अजितदादा पवार यांनी या महामंडळास मंजुरी दिली.राज्याचे मुख्यमंत्री हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असल्याने त्यांनी या महामंडळ मंजुरीची औपचारिक घोषणा केली आहे.
—————————————————————
दीपकआबांनी केलेल्या पाठपुराव्याचा मी स्वतः साक्षीदार :
राज्यातील आर्थिक गर्तेत अडकलेल्या होलार समाजाला राज्य सरकारने मदतीचा हात द्यावा,यासाठी स्वतंत्र होलार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे,ही अनेक वर्षांची मागणी होती. या मागणीसाठी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी अनेकवेळा मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठकी आयोजित केल्या होत्या.या संपूर्ण प्रक्रियेचा मी स्वतः साक्षीदार आहे.आबांनी केलेल्या प्रयत्नाची जाण ठेवून राज्यातील तमाम होलार समाजाच्या वतीने आबांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करणार आहोत.
– शिवाजीराव जावीर (अध्यक्ष- स्वाभिमानी होलार समाज संघटना)
—————————————————————