पडत्या पावसात पुण्यातील सांगोलकरांच्या प्रेमाने न्हाऊन गेलो – दीपकआबा साळुंखे-पाटील
दीपकआबांच्या उपस्थितीत पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सांगोलकरांचा अभूतपूर्व स्नेहमेळावा संपन्न
————————————————
सांगोला :
हाताला काम आणि आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून,आपल्या जन्मभूमीपासून शेकडो मैल दूर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात येऊनही सांगोलकरांनी आपल्या जन्मभूमीतील नेत्याचे धो-धो कोसळणाऱ्या पावसातही प्रचंड प्रमाणात स्वागत केल्याने मातृभूमीतील आपल्या लोकांच्या प्रेमाने अक्षरशः मी न्हाऊन गेलो आहे,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील यांनी केले.
पुणे येथील नवले लॉन्स येथे पार पडलेल्या सांगोलकरांच्या स्नेहमेळाव्यात माजी आमदार दीपकआबा हे बोलत होते. यावेळी तब्बल ७ ते ८ हजार सांगोलकर उपस्थित होते.विशेष म्हणजे,या स्नेह मेळाव्यास महिलांची संख्या लक्षनीय होती.पुणे येथे दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे सांगोला तालुक्यातील नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात आणि प्रचंड घोषणाबाजी करत स्वागत केले,यामुळे पुणे-पिंपरी चिंचवड परिसर अक्षरश: दणाणून गेला होता.
पुढे बोलताना दीपकआबा म्हणाले की,पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात राहणाऱ्या सांगोला तालुक्यातील नागरिकांना येणाऱ्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी आपण लवकरात लवकर पुणे येथे २४ तास खुले राहणारे कार्यालय सुरु करत आहोत तसेच आपल्या तालुक्यातून पुणे येथे कामानिमित्त येणाऱ्या लोकांना अडचणी येवू नयेत यासाठी, मुंबईप्रमाणे पुण्यातही सांगोला भवन उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दीपकआबा पुढे म्हणाले की, आपल्या जन्मभूमीपासून शेकडो मैल दूर असणाऱ्या कोलकत्ता,हैद्राबाद,बंगलोर,मुंबई आणि पुण्यातील सांगोलकरांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवला आहे त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही.तसेच केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी तुमच्याशी संवाद साधणार नाही तर,दरवर्षी दसरा ते दीपावली दरम्यान पुणे येथे तमाम सांगोलकरांचा स्नेहमेळावा आयोजित करणार असल्याचे अभिवचनही शेवटी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी उपस्थितांना दिले.
दरम्यान स्नेहमेळावा सुरु असतानाच मुसळधार पावसाने हजेरी लावली तरी विशेष म्हणजे,एकाही सांगोलकरांनी आपली जागा सोडली नाही.पुण्यात दीपकआबांच्या स्वागताला सांगोला वासियांनी प्रथमच इतक्या प्रचंड प्रमाणात गर्दी केल्याने सांगोला तालुक्यातच जणू एखादी प्रचंड मोठी राजकीय सभा होत असल्याचे वातावरण निर्माण झाले होते.या सभेला सांगोला तालुक्यातील प्रत्येक गाव व खेड्यातील नागरिक, तरुण,महिला आणि माय माऊलींनी उपस्थिती लावली होती.
—————————————————————
पुण्यात विद्यार्थिनींसाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर नावाने मोफत वसतीगृह सुरु करणार :
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी सांगोला येथून पुण्यात आलेल्या तसेच नोकरीच्या मुलाखतीसाठी पुणे येथे आलेल्या कित्येक गरीब व गरजू विद्यार्थिनीना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी किंवा त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे येथे सांगोला तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने मोफत वसतीगृह निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.दीपावलीनंतर हे मोफत वसतीगृह विद्यार्थिनींना वापरण्यासाठी खुले करण्यात येईल.
– सौ.मुक्तादीदी गायकवाड (दीपकआबांच्या कन्या)
—————————————————————
पडत्या पावसातील सभा कधी व्यर्थ जात नाही :
पडत्या पावसात एखादी राजकीय सभा पार पडली तर,निकाल कसा लागतो ? हे सबंध महाराष्ट्राने अनुभवले आहे.पुणे येथे पार पडलेल्या स्नेह मेळाव्यातही अचानक दमदार पावसाने हजेरी लावल्याने आबा आपल्या सभेला नक्कीच यश मिळणार आहे.पुढील वेळी तुम्ही पुण्यात आमदार म्हणूनच येणार,असा विश्वास पुणे येथील स्थायिक सांगोलकरांनी व्यक्त केला.
—————————————————————