मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची आर्थिक पिळवणूक थांबवा अन्यथा,तीव्र आंदोलन करणार – सूरजदादा बनसोडे
सांगोला :
तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे कर्मचारी हे कामानिमीत्त येणार्या नागरिकांना अर्वाच्य भाषा वापरुन अपमानित करीत आहेत. पुरवठा विभागातील ठेका पध्दतीने काम करणारे कर्मचारी हेच वरिष्ठ अधिकाऱ्याचा आव आणून सामान्य नागरिकांची पिळवणूक करीत आहेत.सर्व्हर डाऊनच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची व प्रामुख्याने महिलांची आर्थिक पिळवणूक करत आहेत.याबाबत,तहसीलदार मात्र, बघ्याची भूमिका घेत असून मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची आर्थिक पिळवणूक थांबवा अन्यथा, तीव्र आंदोलन करणार,असा इशारा रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष व माजी नगरसेवक सूरजदादा बनसोडे यांनी दिला आहे.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेसाठी रेशन कार्ड हा महत्त्वाचा पुरावा ग्राह्य धरला जात असल्याने यासाठी नाव वाढविणे व कमी करणे किंवा नवीन रेशन कार्ड काढणे,यासाठी ग्रामीण भागातील नागरिक तहसील कार्यालय आवारात दिवसभर ताटकळत उभे असतात. ऑनलाइन अर्ज करणार्या महिला भगिनींना सर्व्हर डाऊनच्या नावाखाली येथील कर्मचारी त्यांना कार्यालयाबाहेर थांबण्याचा सल्ला देतात. एवढेच नव्हेतर,त्यांनी नेमून ठेवलेले झिरो कर्मचारी हे शासकीय मान्यता नसलेल्या महा-ई-सेवा केंद्रात त्यांना पाठवून तिथे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात आहे.
यामध्ये सेतू कार्यालयात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असून यातूनच वरिष्ठ अधिकारी यांच्यापर्यंत मलिदा पोहोचत असल्यामुळे सेतू व पुरवठा कर्मचार्यांना कसलेही भय राहिलेले नाही. कर्मचार्यांनी जेवढे सांगीतले तेवढे पैसे दिले नाहीतर, काम होणार नाही,अशी वागणूक तहसील कार्यालयात दिली जात आहे. याकडे तहसीलदार यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार राजरोसपणे सुरु असून याला लगाम लावणे गरजेचे आहे.
ठेकेदारी पध्दतीने काम करणार्या कर्मचार्यांना शासकीय नियमानुसार कामकाज करण्याबाबत सक्त ताकीद देण्यात यावी व झिरो कर्मचार्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचे धारिष्ट्य तहसीलदार संतोष कणसे यांनी दाखवावे अन्यथा,तीव्र आंदोलन करु, असा इशारा माजी नगरसेवक सूरजदादा बनसोडे यांनी दिला आहे.
——————————————————————————