सांगोला :
ज्यांनी सांगोल्याला एक रुपयांचा निधी दिला नाही,अशा व्यक्तींचे समर्थक सोशल मीडियावर टीका टिपण्णी करत असून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पाच वर्षात झालेल्या विकासकामांची माहिती सोशल मीडियावर टाकून विरोधकांना चोख प्रत्युत्तर द्यावे.तसेच गावात विरोधकांचे बूथ लागणार नाही, इतके प्रचंड काम कार्यकर्त्यांनी करावे.ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी अशी आहे. विरोधकांनी एक उत्तर दिले तर,आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दहा उत्तरे देण्याची तयारी ठेवावी. सांगोल्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी आपण सर्वाधिक निधी दिला आहे. विकासाची सर्वात जास्त कामे सांगोल्यात झाली असून केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार,असा आत्मविश्वास महायुतीचे उमेदवार तथा भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.
माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार तथा भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी २८ मार्च रोजी सांगोल्यात मिरज रोडवरील हर्षदा लॉन्समध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीस खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील,भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत,शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर,माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ,तानाजी काका पाटील,युवासेना संपर्क प्रमुख सागर पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे,भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार,भाजपा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, रासपचे जिल्हाध्यक्ष सोमा मोटे,माजी जि.प.सदस्य अशोक शिंदे,रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत चव्हाण,आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे काम उत्कृष्ट असून राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे काम त्यांनी केले आहे.सिंचन प्रकल्प व रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खा.निंबाळकर यांनी विशेष कष्ट घेतले आहेत.दुष्काळी सांगोला तालुक्यात हरितक्रांती झाली असून सर्वच्या सर्व गावे सिंचनाखाली आली आहेत.राजापूर आणि बुरलेवाडी गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ताठ मानेने मतदारांपुढे मत मागायला जावे.सर्वात जास्त मताधिक्य सांगोला तालुक्यातून देण्याचा विश्वास व्यक्त करत पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना निवडून देणार असल्याची ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की,लोकसभेची ही निवडणूक देशाच्या भवितव्याची निवडणूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे.पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तसेच खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या बैठकीला महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धारही केला.
——————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक