देशातील सर्वच विधिमंडळांना पथदर्शी ठरणारा हा निर्णय – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला :

घटनेनुसार कायद्याचे सर्व बारकावे पाहूनच सभापती नार्वेकरांनी हा ऐतिहासिक निकाल दिला असून उभ्या महाराष्ट्राला समाधान देणारा हा निकाल आहे आणि अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीलाही हाच निर्णय लागू होणार,असा गौप्यस्फोट करत देशातील सर्वच विधिमंडळांना पथदर्शी ठरणारा हा निर्णय असल्याचे मत “काय झाडी,काय डोंगार अन् काय हाटेल” फेम सांगोल्याचे आम.शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

               संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र राज्यातील आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी उध्दव ठाकरे यांना धक्का देत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर,मुख्यमंत्री शिंदेसेनेच्या गोटातील सांगोल्याचे आमदार शहाजीबापूंनी ही प्रतिक्रिया दिली.

सभापती राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाबाबत बोलताना आमदार शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की,गोंधळ घालून कायदा बदलता येत नसतो.कायदा हा कायदाच असतो,कायद्याच्या सर्व चौकटीत राहून व त्याचे बारकावे पाहूनच सभापती नार्वेकरांनी हा निकाल दिला असून नार्वेकरांनी दिलेला हा निकाल तमाम महाराष्ट्राला समाधान वाटणारा आहे व हा निकाल म्हणजे प्रत्येक लोकप्रतिनिधीला न्याय देणारा निकाल आहे. उद्धव ठाकरेंनी दोनवेळा सादर केलेली घटना ही हुकूमशाही पध्दतीची,खाडाखोडीची,खोटी व लबाडीची असल्यामुळे ही घटना मान्य केली गेली नाही.

यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार म्हणून जे विरोधक दिवास्वप्न पहात होते, त्यांना कायद्याने दिलेली ही एक मोठी चपराकच आहे. या निकालामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.तसेच सतत बरळणारे विरोधक हे लबाड आणि खोटे कसे आहेत ? हे या निकालाने दाखवून दिले असून त्यांची पत महाराष्ट्राच्या जनतेसमोर राहिली नाही. महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करायची,जनतेवर सतत दबाव ठेवायचा आणि राजकारण गढूळ बनवायचे,हा उद्योग करत उध्दव ठाकरे व संजय राऊत यांनी हे सरकार पडणारच,यासाठी तारखा देत गोंधळ घातला.त्यांच्या अशा वागण्याने महाराष्ट्रातील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही,असेही त्यांनी सांगीतले.

              तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व कमकुवत वाटायला लागल्यानेच शिवसेना बळकट करण्यासाठी कणखर नेतृत्व असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी वेगळा निर्णय घेतला.आता अजितदादांच्या राष्ट्रवादीलाही हाच निर्णय लागू होणार, अशी खात्रीही आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी दिली.
—————————————————————————