सांगोल्यातील १९ वंचित गावांना टेंभूच्या अतिरिक्त पाण्यातून १ टीएमसी पाणी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला :

टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अतिरिक्त असणाऱ्या ८ टीएमसी पाणी वाटपाच्या आराखड्याला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान मान्यता मिळाली असून त्यानुसार ५ जानेवारी २०२४ रोजी याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. यामध्ये सांगोला तालुक्यातील १९ वंचित गावांना एक टीएमसी तसेच माण नदीवरील सर्व को.प.बंधारे वर्षातून तीन वेळा भरुन घेण्यासाठी ०.६०० एमसी एफटी असे एकूण १.६०० टीएमसी पाणी नव्याने मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

गेली चार वर्षापासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास भरघोस यश आल्याचे सांगताना तालुक्यातील १९ वंचित गांवांसोबत माण नदीवरील २० गावांना याचा मोठा लाभ होणार असून यापुढे माण नदी बारमाही भरलेली असणार, असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

सदर एक टीएमसी पाण्यातून अजनाळे,लिगाडेवाडी,  चिणके, खवासपूर,जुनी व नवीन लोटेवाडी, मंगेवाडी, सोनलवाडी व वझरे या ७ गावांना एकूण ४ हजार २३१ हेक्टर क्षेत्राला व बुध्देहाळ तलावासोबत सोमेवाडी, पाचेगांव,हातीद,चोपडी, बंडगरवाडी,बुद्धेहाळ या सहा गावांना बुद्धेहाळ तलाव भरणे सहित १२०० हेक्टर क्षेत्राला असे काम गुरुत्व नलिकेतून एकूण ५ हजार ४३१ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार असून डोंगरगाव,हणुमंतगाव, मानेगाव,काळूबाळूवाडी,गुणाप्पावाडी व हटकर मंगेवाडी या सहा गावांना ९०३ हेक्टर क्षेत्राला बेवनूर गुरुत्व नलिकेतून पाणी मिळणार आहे. एकूणच १९ गावांमधील ६ हजार ३३४ हेक्टर क्षेत्राला या एक टीएमसी पाण्याचा लाभ मिळणार आहे.

माण नदीवरील सुमारे २० गावांना नव्याने मंजूर झालेल्या ०.६०० एमसीएफटी पाण्याचा मोठा लाभ होणार असून वर्षातून तीन वेळा माण नदीवरील सर्व बंधारे अधिकृतरित्या भरण्यात येणार असल्याने यापुढील काळामध्ये माण नदी बारमाही भरलेली असणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील सर्व शेतकऱ्यांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या योजनेला मंजुरी मिळविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांचे खूप मोठे सहकार्य लाभल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
—————————————————————————

शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील :

माझ्या दृष्टीने आज अत्यंत समाधानाचा दिवस असून गेली चार वर्षे सातत्याने पाठपुरावा करुन सांगोला तालुक्याचा सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न मी सोडवू शकलो,याचा मला खूप आनंद आहे. उजनीच्या २ टीएमसी पाण्याचा विषयही आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये असून लवकरच त्यालाही मान्यता मिळेल व खऱ्या अर्थाने,सांगोला तालुक्याचा वर्षानुवर्षांचा दुष्काळ कायमस्वरुपी संपून शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील,अशी आशा आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केली.
——————————————————————————