सांगोल्यात ४ पैकी ३ ग्रामपंचायती ताब्यात घेवून शेकापने मारली बाजी

सांगोला :

सांगोला तालुक्यातील चिकमहूद,खवासपूर,वाढेगाव व सावे या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चिकमहूद वगळता, ४ पैकी ३ ग्रामपंचायतींची सत्ता आपल्या ताब्यात ठेवून शेकापने बाजी मारली असली तरी, स्वतःचे गांव असलेल्या चिकमहूद ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यात मात्र,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी यश मिळविले आहे.

सांगोला तालुक्यातील चिकमहूद, खवासपूर,वाढेगाव व सावे या ४ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा निकाल काल सोमवारी जाहीर करण्यात आला.संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या व आम.शहाजीबापू पाटील यांचे गांव असलेल्या चिकमहूद ग्रामपंचायतीवर
आपली एकहाती सत्ता राखण्यात आमदार शहाजीबापू यांना यश मिळाले असले तरी, इतर ३ ग्रामपंचायतींची सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यात त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले असून या ३ ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाने आपला लाल बावटा (झेंडा) फडकावला आहे.

सांगोला तालुक्यातील चिकमहूद ग्रामपंचायतीचे सरपंचपद आपल्या बाजूने खेचून आणण्यात शहाजीबापू पाटील गटाला यश मिळाले असून ऐन निवडणुकीच्या दरम्यान, एकूण १५ जागांपैकी एका उमेदवाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्यामुळे १४ जागांसाठी मतदान झाले होते. या १४ पैकी १३ जागा आम.शहाजीबापू गटाने जिंकल्या आहेत,तर केवळ एकच जागा विरोधकांच्या पारड्यात पडली आहे.

माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांची सत्ता असलेल्या वाढेगाव ग्रामपंचायतीची सत्ता मात्र, यंदा त्यांच्या हातून गेली असून सदर ग्रामपंचायतीवर आता शेकाप व मित्रपक्षाची सत्ता आली आहे. सरपंच पदासह १३ पैकी ७ जागा शेकाप व मित्रपक्षाला मिळाल्या आहेत.त्यामुळे आत्तापर्यंत राष्ट्रवादीची सत्ता असलेली ग्रामपंचायत शेकापने स्वतःकडे खेचून आणली आहे.

तर,परंपरेने शेकापचा बालेकिल्ला असलेल्या सावे ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून शेकापच्याच दोन गटांत झालेल्या लक्षवेधी लढतीत सावे ग्रामपंचायतीतील आपली सत्ता कायम राखण्यात शेकापने यश मिळविले आहे.तसेच मागील १० वर्षापासून आमदार शहाजीबापू पाटील गटाकडे असलेल्या खवासपूर ग्रा.पं.च्या निवडणुकीत मात्र,यंदा आमदार शहाजीबापू गटाला मोठा धक्का बसला असून खवासपूर ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यात शेकापला मोठे यश मिळाले आहे.

पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करुन मिळालेला विजय शांततेत साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
——————————————————————————