निलंबीत पोलीस उपनिरीक्षक सूरज चंदनशिवे यांची निर्घृण हत्या

 

सांगोला :

सांगली पोलीस मुख्यालयात पोलीस उपनिरीक्षकपदी कार्यरत असलेल्या परंतु दोन महिन्यांपूर्वी बडतर्फ करण्यात आलेल्या सूरज चंदनशिवे यांची सांगोला तालुक्यातील वासूद येथे बुधवारी रात्री अज्ञात मारेकर्‍यांनी निर्घृण हत्या केल्याने पोलीस खात्यासह सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

         सदर घटनेची सविस्तर माहिती अशी की,सांगली येथील पोलीस मुख्यालयात पोलीस उपनिरीक्षकपदी कार्यरत असलेले परंतु २ महिन्यांपूर्वी बडतर्फ करण्यात आलेले सूरज चंदनशिवे हे सांगोला तालुक्यातील वासूद या गांवी बुधवारी २ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर शेताबाहेरील वासूद-केदारवाडी या रस्त्यावर शतपावलीसाठी गेले असताना दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने पाठीमागून वार करुन त्यांची हत्या केली असल्याचे सांगण्यात आले.

          २०१८ साली गाजलेल्या वारणानगर (कोल्हापूर) येथील ९ कोटी रुपये चोरी प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे याचेवर गुन्हा दाखल होऊन त्याचे निलंबनही झाले होते. वर्षभरापूर्वी निलंबन मागे घेतल्याने सध्या सांगली पोलीस मुख्यालयात कंट्रोल विभागात तो कार्यरत होता. मात्र,२ महिन्यांपूर्वी सूरज चंदनशिवे यास पोलीस दलातून पुन्हा बडतर्फ करण्यात आले होते.त्यामुळे,सूरज चंदनशिवे सध्या गांवाकडे शेतात राहायला आला होता.दररोज जेवण झाल्यावर रात्री उशिरा शतपावली करायची सवय असल्याने नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री जेवण झाल्यावर वासूद-केदारवाडी रोडवर शतपावली करत असताना दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी त्याचा निर्घृण खून केला.

                शतपावली करायला गेलेला सूरज परत घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध सुरु केला असता, पहाटे फिरायला आलेल्या कांही जणांना सूरज चंदनशिवेचा मृतदेह दिसला.ही बातमी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना समजताच ते तात्काळ आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि चंदनशिवे यांचा मृतदेह ताब्यात घेवून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.सदर घटनेची माहिती मिळताच,सोलापूर जिल्ह्याचे (ग्रामीण) अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

पोलीस उपनिरीक्षक सूरज चंदनशिवे हे सांगली जिल्ह्यात काम करत असताना तिथे कांही वादग्रस्त प्रकरणात त्यांचं नांव आल्याने त्यांना कांहीकाळ निलंबित करण्यात आले होते आणि अलिकडेच त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. बडतर्फीनंतर अवघ्या दोनच महिन्यात त्यांची निर्घृण हत्या झाल्याने वासूदसह सांगोला तालुक्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
——————————————————————————